मुनावळे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुलं, साहसी खेळांचा लुटता येणार आनंद, असे असतील दर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Munawale: मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे.
सातारा : देशातील गोड्या पाण्यातील पहिले जलपर्यटन केंद्र असलेले मुनावळे हे जागतिक दर्जाचे जलपर्यटन आता पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पावसाळ्यात राज्यातील महत्त्वाची जलपर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र पावसाने निरोप घेताच कोयना धरणावरील जलपर्यटन केंद्र सुरू झाल्यामुळे राज्यभरातील पर्यटकांना आता साहसी खेळांचा आनंद लुटता येणार आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोयनेच्या शिवसागर जलाशयावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यात आले आहे. कोयना धरण व शिवसागर जलाशय परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, गर्द झाडी, निळेशार पाणी समृद्ध जैवविविधतेचे आगर आहे. मुनावळे येथे पर्यटकांना आता स्कुबा डायविंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग, बम्पर राईड, लेक क्रूझिंग बोट, फ्लाईंग फिश, कयाकिंग आदींचा थरार अनुभवता येणार आहे. या जलपर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था वृद्धिंगत होत असून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
advertisement
पर्यावरणपूरक बोटींचा वापर
मुनावळे येथे अत्याधुनिक व सर्व सोयींनीयुक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि जल पर्यटन क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक बोटींचा वापर करण्यात येत आहे.
असे असतील दर
बनाना राईड ३०० रुपये प्रती व्यक्ती १००० मीटर
advertisement
बम्पर राईड ३०० रुपये प्रती व्यक्ती १००० मीटर
फ्लाईंग फिश ३०० रुपये प्रती व्यक्ती १००० मीटर
जेट स्की ३०० रुपये प्रती व्यक्ती १००० मीटर
पॅरासेलिंग ७०० रुपये प्रती व्यक्ती १००० मीटर
साहसी सायकल राईड ६०० रुपये ३० मिनिटे
लेक क्रुझिंग सफर २५०० रुपये ६ व्यक्ती ३० मिनिटे
रिगल हाय स्पीड बोट ३५०० रुपये ६ व्यक्ती ३० मिनिटे
advertisement
साहसी पर्यटकांना मुनावळेचे जल पर्यटन नेहमीच खुणावत असते. येथील आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्रावर साहसी जेट स्की राईड, पॅरासेलिंगसह लेक क्रुझिंग बोट सेवेला पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे- गोविंद खवणेकर (सहाय्यक व्यवस्थापक, कोयना जलपर्यटन केंद्र, मुनावळे)
Location :
Satara,Maharashtra
First Published :
October 07, 2025 11:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुनावळे जलपर्यटन पर्यटकांसाठी खुलं, साहसी खेळांचा लुटता येणार आनंद, असे असतील दर