बाबा घरी कधी येणार? अडीच वर्षांच्या 'साहिशा'चा हिरो हरपला, साताऱ्याच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Jammu Kashmir Army Vehicle Accident: ज्यावेळी भारतीय सैन्यदलाची गाडी दरीत कोसळली, त्यावेळी गाडीतून १८ जवान प्रवास करत होते.
सातारा : जम्मू काश्मिरच्या पूंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी भारतीय सैन्यदलाची एक गाडी दरीत कोसळली होती. गाडीचा मेंढरच्या बलनोई परिसरात रस्ता चुकला होता. यानंतर ही गाडी खोल दरीत कोसळली. यात ५ जवानांचा मृत्यू झाला, तर १२ जवान जखमी झाले होते. आता मृतांमध्ये महाराष्ट्राच्या दोन जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील शुभम समाधान घाडगे (२८) आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान अक्षय निकुरे अशी या मृत जवानांची नावं आहेत.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी या गाडीला अपघात झाला, त्यावेळी गाडीतून १८ जवान प्रवास करत होते. यातल्या ५ जवानांचा मृत्यू झाला आहे, तर इतर जवानांवर उपचार सुरू आहेत. ही गाडी नीलम मुख्यालयापासून बलनोई घोरा पोस्टच्या दिशेनं जात होती. 11 एमएलआय ही गाडी घोरा पोस्टजवळ जाताच वाहनाला अपघात झाला आणि ही गाडी जवळपास ३०० ते ३५० फूट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच क्यूआरटी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य करण्यात आलं.
advertisement
या अपघातात ११ मराठा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर असणारे शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपुत्र आहेत. देशाची सेवा करताना त्यांना वीरमरण आलं आहे. अवघ्या २८ वर्षांच्या शुभम यांचा अशाप्रकारे अपघातात मृत्यू झाल्याने कामेरी गावासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपुत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले असून शुभमच्या पश्चात आई-वडील, पत्नी अर्चना, अडीच वर्षांची मुलगी साहिशा, लहान भाऊ संजय असा परिवार आहे.
advertisement
शुभम घाडगे यांचं प्राथमिक शिक्षण कामेरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. तर माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालयात पूर्ण केलं. पुढे छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये त्यांनी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. शुभम याचं पार्थिव सकाळी दहा वाजता कामेरी इथं आणलं जाणार आहे. दुपारी तीननंतर अंतयात्रेला सुरुवात होईल.
advertisement
दुसरीकडे, या दुर्घटनेत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील अक्षय निकुरे या जवानाचा देखील मृत्यू झाला आहे. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे अक्षय यांचे बंधू नीलेश देखील सैन्यदलात कार्यरत आहेत. ते मराठा लाइट इन्फट्री बटालियनमध्ये कर्तव्यावर आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
December 26, 2024 8:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
बाबा घरी कधी येणार? अडीच वर्षांच्या 'साहिशा'चा हिरो हरपला, साताऱ्याच्या सुपुत्राला काश्मीरमध्ये वीरमरण