भाजपला सर्वात मोठं खिंडार, शिंदेंकडून 45 ठिकाणी स्ट्राईक, 400 जण गळाला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशात सातारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपला सर्वात मोठं खिंडार पाडलं आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी सातारा: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ च्या आधी घ्या, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्या ज्या ठिकाणी पक्ष कमकुवत आहे, तिथे विरोधी पक्षाचे वजनदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून केला जात आहे. अशात सातारा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने भाजपला सर्वात मोठं खिंडार पाडलं आहे.
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाईंनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. तब्बल 45 गावातील 400 जणांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार पडल्याने महायुतीतील अंतर्गत कुरघोडी चर्चेचा विषय ठरत आहे.
खरं तर, साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात देसाई आणि पाटणकर या दोन गटात पारंपरिक राजकारण पाहायला मिळते. पूर्वीपासून देसाई गट हा शिवसेना युतीचा भाग होता तर पाटणकर गट राष्ट्रवादीमधून आघाडी धर्म पाळत होता. मात्र आता दोन्ही गट महायुतीचा भाग असून पाटणकर गट भाजपमध्ये आहे. असं असताना देखील मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना धक्क्यावर धक्के देताना दिसत आहेत. पाटण विधानसभा मतदारसंघातील तब्बल 45 गावातील 400 कार्यकर्त्यांनी एकाचवेळी पाटणकर गटाची साथ सोडत देसाई गटात पक्ष प्रवेश केला आहे. शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भाजपाला दिलेला धक्का राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
September 30, 2025 8:21 AM IST