शशिकांत शिंदे यांनी थेट अजितदादांच्या अस्थींची शपथ घेतली, विलिनीकरणावर फडणवीसांचा वेगळाच दावा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार मला सगळंच सांगत होते, जर विलिनीकरण करायचे असते तर त्यांनी मला सांगितले असते, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या मतप्रदर्शनानंतर शशिकांत शिंदे यांनी थेट अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकींचा हवाला दिला.
मुंबई : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जर सुरू असती तर अजित पवार यांनी मला सांगितले असते असे सांगून अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असा अप्रत्यक्ष दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी थेट अजित पवार यांच्या अस्थींची शपथ घेऊन चर्चा झाली होती, असे सांगून फडणवीस यांना निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार यांच्या माघारी विलिनीकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादीची सूत्रे शरद पवार यांच्या हातात जाऊ नयेत, याची पुरेपूर काळजी दादांच्या पक्षातील वरिष्ठ महत्त्वकांक्षी नेते घेत आहेत. त्यांच्याच सल्ल्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची प्रक्रिया वायूवेगाने उरकण्यात आली. एकंदर विलिनीकरणाचा जांगडगुत्ता लवकर सुटणार नसल्याचे चित्र उभे राहिलेले असताना दुसरीकडे पवार गटाकडून मात्र विलिनीकरण व्हावे, अशी आग्रही भूमिका मांडली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया देऊन या वादात एन्ट्री केली. अजित पवार मला सगळंच सांगत होते, जर विलिनीकरण करायचे असते तर त्यांनी मला सांगितले असते, असे फडणवीस म्हणाले. त्यांच्या मतप्रदर्शनानंतर शशिकांत शिंदे यांनी थेट अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकींचा हवाला दिला.
advertisement
अजितदादांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो की....
शशिकांत शिंदे म्हणाले, मला यामध्ये राजकारण करायचे नाही. दादांच्या जाण्यानंतर आम्ही कुणी राजकीय फायदा उठवतोय असे चित्र महाराष्ट्रासमोर जाणे दुर्दैवी आहे. अजित पवार यांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो, माझे त्यांच्याशी भावनिक नाते आहे. अजित पवार यांनी आमच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा केली होती.
अजित पवार म्हणाले होते, माझी वरिष्ठांशी चर्चा झालीये!- शशिकांत शिंदे
advertisement
विलिनीकरणाबाबत अजित पवार यांनी आम्हाला कळवले असते असे फडणवीस म्हणाले. त्यावर शशिकांत शिंदे यांना विचारले असता, अजित पवार यांनी याविषयी कुणाशी चर्चा करावी, कुणाला सांगावे, हा त्यांचा प्रश्न होता. आम्ही त्यांना विचारले होते की तुम्ही तुमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली का? मित्रपक्षांशी चर्चा केली? तुमचे यासंबंधाने कुणाशी बोलणे झाले आहे का? यावर त्यांनी माझा निर्णय झाला आहे, वरिष्ठांशी देखील मी चर्चा केली आहे, असे उत्तर आम्हाला दिल्याचे शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
advertisement
तसेत अजितदादांच्या उत्तरानंतर आम्ही कुणाला विचारायला जाणे, हे आम्हाला बरोबर वाटले नाही. शेवटी असे चित्र रंगवले जात आहे की दादांच्या जाण्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाला याचा राजकीय फायदा घ्यायचा आहे, पण मी स्पष्ट करू इच्छितो की असे चित्र महाराष्ट्रासमोर जाणे दुर्दैवी आहे. असा आमचा अजिबात प्रयत्न नाही. पण मी अतिशय जबाबदारीने सांगतो की अजित पवार यांच्या अस्थींची शपथ घेऊन सांगतो की याविषयी आमची चर्चा झाली होती, सुरू होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 3:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शशिकांत शिंदे यांनी थेट अजितदादांच्या अस्थींची शपथ घेतली, विलिनीकरणावर फडणवीसांचा वेगळाच दावा









