Sanjay Raut : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय, निकालाला तेच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
- Published by:Suraj
Last Updated:
Sanjay Raut On DY Chandrachud : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालावर संताप व्यक्त करताना थेट माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार ठरवलंय.
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागला. महायुतीने २०८८ पैकी २३४ जागा जिंकून महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. महायुतीच्या नेत्यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया देताना अनाकलनीय असं म्हटलंय. तर निकालात गडबड असल्याचाही आरोप केलाय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालावर संताप व्यक्त करताना थेट माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना जबाबदार ठरवलंय. शिवसेनेत फुटीनंतर आमदार अपात्रतेसंदर्भात तयार झालेल्या घटनात्मक पेचावर चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. यामुळेच हे घडल्याचं राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी म्हटलं की, देशाचं सर्वोच्च न्यायालय ज्यांनी लवकर निर्णय द्यायला हवा होता. आमदार अपात्रतेचा निर्णय द्यायला हवा होता. मग तुम्ही कशाला बसलाय. तुम्ही निर्णय देत नसाल तर खुर्च्या कशासाठी उबवताय. जनतेच्या पैशांचा चुराडा कशाला करताय.सरकारवर का ओझं बनताय? असा प्रश्नही राऊतांनी विचारला. निकालाला, दुर्घटनेला चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल असा घणाघातही राऊतांनी केला.
advertisement
धनंजय चंद्रचूड हे उत्तम लेक्चरर म्हणून चांगले आहेत. पण सरन्यायाधीश म्हणून घटनात्मक पेचावर निर्णय देऊ शकले नाहीत यावर इतिहास त्यांना माफ करणार नाही. त्यांनी निर्णय दिला असता तर महाराष्ट्राचं चित्र बदललं असतं. त्यांनी निर्णय न दिल्यानं पक्षांतराच्या खिडक्या आणि दरवाजे ते उघडे ठेवून गेले. आताही कोणी कशाही उड्या मारू शकेल, कुणालाही विकत घेऊ शकेल. कायद्याची दहाव्या शेड्युलची भितीच राहिली नाहीय. न्यायमूर्तींनीच भिती घालवली असल्याचं राऊत म्हणाले.
advertisement
महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावरूनही राऊतांनी खोचक टीका केली. संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवेल. राज्यात शपथ घेण्यापेक्षा गुजरातमध्ये शपथविधी घेतला तर त्यांच्या लोकांना आनंद होईल. मोदींच्या नावाने स्टेडियम आहे तिथं त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारचा शपथविधी घेणं संयुक्तिक ठरेल. शीवतीर्थावर घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ठरेल, वानखेडेवर घेतला तर १०६ हुतात्म्यांचा अपमान होईल. हे सरकार गुजरात लॉबीला हवं होतं, हे लादण्यात आलंय आणि आणण्यात आलंय.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2024 10:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामुळे महायुतीचा विजय, निकालाला तेच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप


