लेकाच्या उपमुख्यमंत्रिपदाचे एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत, श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत तुमची बोलणी सुरू आहे का, असे एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले.
सातारा (दरे गाव) : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न स्वीकारता त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवतील, अशी जोरदार चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांनीही या चर्चांना रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हवा दिली.
श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करण्यासाठी भारतीय जनता पक्षासोबत तुमची बोलणी सुरू आहे का, असे एकनाथ शिंदे यांना विचारल्यानंतर चर्चेची शक्यता फेटाळून न लावता साधक बाधक चर्चेतून महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला जाईल, असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले. एकप्रकारे त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचे स्पष्ट संकेत दिले.
उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? श्रीकांत शिंदे म्हणाले...
advertisement
यावरतीच श्रीकांत शिंदे यांना विचारले असता या पदाचा मी कधीही विचार केला नाही. साधा कार्यकर्ता म्हणून काम करत आलेलो आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इथून पुढेही मी काम करत राहिन, असे टिपिकल राजकीय उत्तर त्यांनी दिले.
भाजप पक्षश्रेष्ठींशी अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू, साधक बाधक चर्चेतून मार्ग काढू
राजकारणात अशा चर्चा होत असतात, परंतु मी कधीही उपमुख्यमंत्रिपदाबाबत विचारही केला नाही. माध्यमे अशा गोष्टींची अधिक चर्चा करतात. चर्चांवर जास्त उत्तरे देत बसायचे नाही. मी साधा कार्यकर्ता म्हणून काम केले आहे, कार्यकर्ता म्हणूनच मी इथून पुढे काम करत राहील. भाजप पक्षश्रेष्ठींशी अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहेत. साधक बाधक चर्चांतून मार्ग काढला जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
advertisement
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक चांगली कामे केली, त्यामुळे लोकांची पुन्हा महायुतीला पसंती
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला होणाऱ्या विलंबावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, विरोधकांकडे सध्या काहीच मुद्दा नाहीये. त्यामुळे त्यांची बडबड सुरू आहे. महायुतीचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर होतोय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक चांगली कामे केली. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा महायुतीलाच पसंती दिली.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
December 01, 2024 5:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकाच्या उपमुख्यमंत्रिपदाचे एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट संकेत, श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया