रील्स बनवून फेमस झाली, वाईट सवयीनं सगळी इज्जत गेली, रिलस्टार तरुणीसह प्रियकराचा भयंकर कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोशल मीडियावर रील्समुळे लोकप्रिय झालेली आणि हजारो फॉलोअर्स असलेली एक तरुणी प्रत्यक्षात बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरणारी सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं आहे.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी अहिल्यानगर: सोशल मीडियावर रील्समुळे लोकप्रिय झालेली आणि हजारो फॉलोअर्स असलेली एक तरुणी प्रत्यक्षात बस प्रवासादरम्यान महिलांचे दागिने आणि रोकड चोरणारी सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालं आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने या 'रीलस्टार'चा पर्दाफाश केला असून, तिच्या प्रियकरासह तिला अटक करण्यात आली आहे. 'बंटी-बबली' स्टाईलने चोरी करणाऱ्या या जोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोमल जगन्नाथ काळे (रा. भीमसेन नगर, शेवगाव) आणि तिचा प्रियकर सुजीत राजेंद्र चौधर (रा. निपाणी जवळा, पाथर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. कोमल काळे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. तिचे इन्स्टावर ५० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती चोरीच्या घटना सहजपणे करायची. चोरलेल्या दागिन्यांतून मिळणाऱ्या पैशांतून ही जोडी महागड्या वस्तूंची खरेदी करत असल्याचं तपासात समोर आलं आहे.
advertisement
या दोघांना अटक करण्यामागे पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेला एक गुन्हा निमित्त ठरला. पाथर्डी तालुक्यातील अलका मुकुंद पालवे या पाथर्डी बस स्थानकातून कल्याणकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांचे दागिने चोरीला गेले. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवासाच्या दरम्यान महिलांचे दागिने चोरीला जाण्याच्या अनेक घटना वाढल्या होत्या. या वाढत्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणांचा समांतर तपास हाती घेतला होता. त्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते.
advertisement
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणातून तपास केला असता कोमल काळे हिचं नाव समोर आलं. सोशल मीडियावर धमाल करणारी ही 'रीलस्टार'च प्रत्यक्षात चोरीची सूत्रधार असल्याचे उघडकीस येताच पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कोमल काळे आणि तिचा प्रियकर सुजीत चौधर या दोघांनाही अटक केली आहे. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, त्यांनी अशा प्रकारे आणखी किती महिलांना लुटले आहे, याचा कसून तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
December 04, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रील्स बनवून फेमस झाली, वाईट सवयीनं सगळी इज्जत गेली, रिलस्टार तरुणीसह प्रियकराचा भयंकर कांड


