विहिरीचा कठडा ढासळला, सोलापुरात २ शाळकरी मुलं मातीत खचली, मुलांचा आरडाओरडा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Solapur News: शाळेला सुट्ट्या लागल्याने पाच मित्र विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. मुले पोहत असताना अचानक विहिरीचा कठडा ढासळला.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहिरीचा कठडा ढासळल्याने दोन शाळकरी मुलं मातीत खचून विहिरीत बुडाल्याची घटना घडली आहे. बचाव पथकाकडून त्यांचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
शाळेला सुट्ट्या लागल्याने पाच मित्र विहिरीत पोहण्यासाठी गेली होती. मुले पोहत असताना अचानक विहिरीचा कठडा ढासळला. भीमरत्न हरिश्चंद्र राजगुरू (वय 14) आणि नैतिक सोमनाथ माने (वय 15) हे दोघे विहिरीत बुडाले. इतर तीन जण सुखरुपपणे विहिरीच्या बाहेर निघाले.
नेमकी घटना कशी घडली?
आज बोरामणी गावात साधारण साडे बाराच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या विहिरीत पाच शाळकरी मुले पोहण्यासाठी गेली होती. मात्र अचानकपणे विहिरीचा कठडा ढासळला. या दुर्घटनेत दोन मुले मातीत अडकली. बाकीच्यांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत विहिरीत असलेल्या तिघांना पाण्यातून बाहेर काढलं.
advertisement
सदर ठिकाणी पोलीस प्रशासन, दक्षिण तहसील प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्रशासन आणि स्थानिक लोकांच्या मदतीने मुले बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून या ठिकाणी मुलांचे शोधकार्य सुरू आहे. मात्र विहिरीत पाणी जास्त असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत, असे कळते आहे. मुलांना रेस्क्यू करण्यासाठी 5 आणि 10 एचपीच्या मोटारीच्या साहाय्याने पाणी उपसा सुरू आहे. विहिरीमध्ये पाणी पातळी जास्त असल्याने वेळ लागत आहे. तसेच त्यासोबतच जेसीबीच्या साहाय्याने माती काढण्याचे काम सुरू आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
May 01, 2025 5:59 PM IST