खाकीचं स्वप्न अधुरं! नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेला अजय परतलाच नाही, सोलापुरातील हृदयद्रावक घटना
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या एका उमद्या तरुणाचा नियतीने क्रूर घात केला. ब्रह्मपुरी येथील 21 वर्षीय अजय दीपक पुजारी या तरुणाचा माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सोलापूर : खांद्यावर खाकी वर्दी चढवून आई-वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं स्वप्न उराशी बाळगलेल्या एका उमद्या तरुणाचा नियतीने क्रूर घात केला. ब्रह्मपुरी येथील 21 वर्षीय अजय दीपक पुजारी या तरुणाचा माचणूर येथील भीमा नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी जटाशंकर घाटाजवळ घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अजय आपल्या काही मित्रांसोबत माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेला होता. जटाशंकर घाटावर पोहण्यासाठी नदीच्या पात्रात उतरल्यानंतर, अचानक पाय घसरल्याने तो खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र नदीच्या पात्रात काळानं त्याच्यावर झडप घातली होती.
advertisement
अजय हा केवळ एक तरुण नव्हता, तर आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता. त्याचे स्वप्न पोलीस दलात भरती होण्याचे होते. त्यासाठी तो माचणूर येथील जयहिंद करिअर अकॅडमीमध्ये दिवस-रात्र घाम गाळत होता. मैदानी चाचणी असो वा लेखी परीक्षा, प्रत्येक गोष्टीत तो आघाडीवर असायचा. यंदा वर्दी मिळवूनच घरी येईन, हा त्याचा निर्धार एका क्षणात भीमेच्या पात्रात विरून गेला. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. ऐन तारुण्यात मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने पुजारी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरला पाहण्याचे आई-वडिलांचे स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही, ही जाणीव सर्वांचे डोळे ओलावणारी आहे.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/सोलापूर/
खाकीचं स्वप्न अधुरं! नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरलेला अजय परतलाच नाही, सोलापुरातील हृदयद्रावक घटना










