Solapur News: महिन्यांची मेहनत; दिवसभर काढला 3 एकरातला हरभरा, सकाळी शेतात जाऊन बघताच बसला धक्का
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Solapur News: तीन एकर हरभरा एका रात्रीत लंपास करण्यात आला. काढणीला आलेले पीक चोरीला जात असल्याने आता शेतात रात्रभर राखण करण्याची वेळ बळीराजावर आली आहे.
सोलापूर: शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून शेती करायची आणि सुगीचे दिवस आले की चोरट्यांनी त्यावर डल्ला मारायचा, असा संतापजनक प्रकार मंगळवेढ्यात समोर आला आहे. बोराळे रोडवरील एका शेतातून चोरट्यांनी तब्बल 1 लाख 75 हजार रुपये किमतीचा हरभरा चोरून नेला आहे. तब्बल तीन एकर क्षेत्रातील हरभरा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा येथील तरुण शेतकरी गणेश विष्णू कोंडभैरी यांची बोराळे रोडवर गट नंबर 812 मध्ये शेती आहे. चालू हंगामात त्यांनी 3 एकर क्षेत्रात हरभऱ्याचे पीक घेतले होते. पीक काढणीला आल्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी मजुरांच्या साहाय्याने दिवसभर हरभरा काढण्याचे काम सुरू होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व हरभरा उपटून त्याचा एक मोठा ढीग शेतातच सुरक्षितपणे लावून कोंडभैरी कुटुंबीय घरी परतले. वर्षभराच्या मेहनतीचे फळ आता हाती येणार, या आनंदात ते होते.
advertisement
दुसऱ्या दिवशी, 10 फेब्रुवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास गणेश आणि त्यांचे वडील शेताला पाणी सोडण्यासाठी गेले. मात्र, शेतात पाऊल ठेवताच त्यांना धक्का बसला. ज्या ठिकाणी हरभऱ्याचा मोठा ढीग लावला होता, ती जागा पूर्णपणे रिकामी होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी मोठ्या वाहनाच्या साहाय्याने हा सर्व हरभरा लंपास केला होता. परिसरात सर्वत्र शोध घेऊनही काहीच थांगपत्ता न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
याप्रकरणी गणेश कोंडभैरी (वय 28) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 303 (2) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 लाख 75 हजारांचा माल चोरीला गेल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरीचा तपास पोलीस हवालदार सुरेश कांबळे करत आहेत.
दरम्यान, काढणीला आलेले पीक चोरीला जात असल्याने आता शेतात रात्रभर राखण करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. पोलीस या गुन्ह्याचा छडा लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 13, 2026 10:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: महिन्यांची मेहनत; दिवसभर काढला 3 एकरातला हरभरा, सकाळी शेतात जाऊन बघताच बसला धक्का










