Adv Siddharth Shinde: कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला, ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचं निधन
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
Adv Siddharth Shinde Death : सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील अॅड. सिद्धार्थ शिंदे यांचे सोमवारी रात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुप्रीम कोर्टात त्यांना चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 49 वर्षांचे होते. राज्यातील सत्तांतर, पक्षफुटीपासून ते विविध घडामोडींचे सुप्रीम कोर्टातील सुनावणी सोप्या शब्दांत लोकापर्यंत त्यांनी पोहचवल्या. कायदेशीर बाबींचे सोप्या शब्दात उलगडून सांगत असल्याने ते लोकप्रिय झाले होते.
मूळचे श्रीरामपूर येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ शिंदे यांचे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यामध्ये स्थायिक आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे सिद्धार्थ शिंदे हे नातू होते. अॅड. सिद्धार्थ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
सोप्या भाषेत कायद्याचं विश्लेषण मांडल्यामुळे सिद्धार्थ शिंदे यांची महाराष्ट्राला वेगळी ओळख आहे. अनेक वर्षांपासून सिद्धार्थ शिंदे हे सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते. सोमवारी ते नेहमीप्रमाणे न्यायालयीन कामासाठी सुप्रीम कोर्टात गेले असता अचानक त्यांना चक्कर आली. तत्काळ त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अॅड. सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनाने न्यायलयीन आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
advertisement
आज पुण्यात अंत्यसंस्कार...
सर्वोच्च न्यायालयाचे विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पार्थिव नवी दिल्लीहून मंगळवार 16 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात येणार असून दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार केले जातील.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
September 16, 2025 8:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Adv Siddharth Shinde: कोर्टातील किचकट सुनावणी सोप्या भाषेत सांगणारा विधीज्ञ हरपला, ॲड. सिद्धार्थ शिंदे यांचं निधन