ताम्हिणीनंतर गोंदा घाटात भीषण अपघात, 30-40 जणांना घेऊन जाणारा टेम्पो उलटला
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर-मोखाडा दरम्यान गोंदा घाट आहे. या घाटात आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. अपघातावेळी टेम्पोत ३० ते ४० प्रवासी होते.
विजय पटेल, प्रतिनिधी विक्रमगड: गुरुवारी दुपारी ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक थार घाटातून ४०० ते ५०० फूट खोल दरीत जाऊन कोसळली आहे. यात सहा तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सहाही जण १७ तारखेला कोकणात फिरायला गेले होते. मात्र जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. ही भीषण अपघाताची घटना ताजी असताना आता पालघर जिल्ह्याच्या गोंदा घाटात देखील भीषण अपघात झाला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर-मोखाडा दरम्यान गोंदा घाट आहे. या घाटात आयशर टेम्पोला भीषण अपघात झाला आहे. अपघातावेळी टेम्पोत ३० ते ४० प्रवासी होते. टेम्पो उलटल्याने एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 30 ते 40 प्रवासी जखमी झाले आहेत. गंभीर जखमी प्रवाशांवर नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि मोखाड्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जव्हार आणि मोखाड्यातील आदिवासी मजूर मजुरी आणि रोजगारासाठी नाशिक येथे गेले होते. काम झाल्यानंतर सर्व मजूर आयशर टेम्पोने पुन्हा आपल्या घरी परतत होते. दरम्यान, गुरुवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर-मोखाडा दरम्यान गोंदा घाटातील तोरणगड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात जव्हार हाडे येथील सुभाष शंकर दिवे वय 22 या मजुराचा जागीच मृत्यू झाला असून 30 ते 40 प्रवाशांसह आयशर टेम्पो चालक गंभीर जखमी झाले आहेत. अती गंभीर जखमी 8 मजुरांना नाशिक सिव्हिल रुग्णालयात तातडीने पाठवले असून काही प्रवासी मजुरांना त्र्यंबकेश्वर व मोखाडा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
खरं तर, पावसाळ्यानंतर शेतीची कामे आटोपल्यानंतर गाव पातळीवर रोजगार उपलब्ध होत नाही. गावात रोजंदारी दर 200 ते 300 रुपये मिळतो. अशात नाशिक येथे500 ते 700 रुपये मजुरी मिळते. त्यामुळे जव्हार व मोखाड्यातील आदिवासी मजूर कुटुंबासह रोजगारासाठी नाशिक येथे स्थलांतर करत असतात. नाशिक परिसरात काम करून संध्याकाळी मिळेल त्या वाहनाने मजूर पुन्हा घरी येतात. अशाच खासगी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने आयशर टेम्पो वळणावर पलटी झाला आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती आहे.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
November 21, 2025 7:04 AM IST


