ठाण्यात भाजपची फिल्डींग, मुंबईत शिंदे गटाचा होणार गेम? निवडणूक जिंकताच भाजपचा नवा डाव
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ठाणे महापालिकेचा निकाल लागल्यानंतर भाजपनं वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. थेट 'विरोधात बसण्याची' तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून आपलं एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं आहे. इथं शिवसेनेनं भाजपसोबत युती करुन निवडणूक लढवली होती. पण आता निकाल लागल्यानंतर भाजपनं वेगळी भूमिका घेण्याची तयारी केली आहे. भाजपने आता थेट 'विरोधात बसण्याची' तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे. "सत्ता अमर्याद नसावी, त्यावर अंकुश हवा, त्यासाठी आम्ही विरोधी पक्षात बसण्यास तयार" अशी आक्रमक भूमिका घेत भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे ठाण्यात नव्या संघर्षाला तोंड फुटताना दिसत आहे.
महायुतीचे वर्चस्व, पण ठाकरेंना मोठा धक्का
ठाण्यातील एकूण १३१ जागांपैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) ७५, भाजप-२८, राष्ट्रवादी (शरद पवार गट)-१२, राष्ट्रवादी (अजित पवार गट)-०९, शिवसेना (ठाकरे गट)-०१, इतर पक्षांना ०६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मोठा फटका बसला असून, त्यांचे निष्ठावंत माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचाही पराभव झाला आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
advertisement
'आम्ही स्वतःहून चर्चेला जाणार नाही' -भाजप आक्रमक
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. केळकर म्हणाले की, "आम्ही ४० जागा लढवल्या आणि २८ जागांवर यश मिळवले. २०१७ च्या तुलनेत आमच्या ५ जागा वाढल्या आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करू. गरज पडली तर आम्ही विरोधात बसायलाही तयार आहोत."
advertisement
विशेष म्हणजे, महापौरपदाच्या चर्चेसाठी भाजप स्वतःहून पुढाकार घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. "त्यांना (शिवसेनेला) चर्चा करायची असेल तर ते येतील, आम्ही जाणार नाही," या विधानामुळे युतीमधील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
ठाण्यात भाजपची फिल्डिंग, मुंबईत शिंदेंचा गेम होणार?
पण हा संघर्ष केवळ ठाण्यापूरता मर्यादीत नसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुंबईत सत्तेच्या सगळ्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यासाठी भाजप ठाण्यात एकनाथ शिंदेंची अडचण करत असल्याची चर्चा देखील आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण मुंबईत शिवसेना शिंदे गट किंगमेकरच्या भूमिकेत आहे. शिंदेशिवाय भाजपला इथं सत्ता स्थापन करता येणार नाही, अशा स्थितीत ठाणेच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची अडचण निर्माण केली, तर मुंबईत शिंदे सरेंडर करतील, आणि भाजपला सत्तेत जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात पाडून घेता येईल, अशीही खेळी यामागे असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 7:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ठाण्यात भाजपची फिल्डींग, मुंबईत शिंदे गटाचा होणार गेम? निवडणूक जिंकताच भाजपचा नवा डाव









