ठाणेकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणी जपून वापरा, महापालिकेने सांगितलं यामागचं महत्त्वाचं कारण
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा स्त्रोत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : ठाण्यातील कळवा मुंब्रा व दिवा या शहरांमधील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. हा पाणीपुरवठा 24 तास बंद राहणा आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ठाण्यात पाणी बंद, कारण काय -
महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा स्त्रोत असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळेच कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांत आणि ठाण्याच्या काही भागात पाणी पुरवठा शुक्रवारी पुर्ण दिवस म्हणजेच 24 तास बंद राहणार आहे. यामुळे शुक्रवारी तर पाणी येणार नाहीच. पण पुढील एक ते दोन दिवससुद्धा कमी प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
advertisement
ठाणे शहरात दरदिवशी चार स्त्रोतांमार्फत दररोज 590 दशलक्ष लीटर इतक्या मोठया प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून 120 दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा 135 दशलक्ष लीटर पाणी पुरवठ्याचे नियोजन कळवा, मुंब्रा, दिवा आणि ठाण्याच्या काही भागात करण्यात येते.
advertisement
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे या भागांचा पाणी पुरवठा गुरुवार, 27 जुन रोजी रात्री 12 ते शुक्रवार, 28 जुन रोजी रात्री 12 या कालावधीत 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे दिवा, मुंब्रा, कळवा मधील सर्व भागामध्ये आणि रुपादेवी पाडा, किसननगर, नेहरुनगर तसेच मानपाडा, कोलशेत खालचा गाव या भागांचा पाणीपुरवठा बंद राहील.
advertisement
नागरिकांना आवाहन -
दिवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये कायमच पाण्याच्या टंचाईचा प्रश्न उभा असतो. मुंब्रा आणि दिव्यातील लोकांनी याआधीही अनेक वेळा पाणीटंचाई होते, म्हणून आंदोलनही केले आहे. काही दिवसांपूर्वीच मुंब्य्रात पुन्हा एकदा पाण्याच्या समस्येमुळे लोकांना आंदोलन करावे लागले होते. या सगळ्या समस्यांना नागरिक सामोरे जात असतानाच पुन्हा एकदा प्रशासनाने त्यांच्या समोर या जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामानिमित्ताने पाणी टंचाईची समस्या उभी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी 2 ते 3 दिवस पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
June 26, 2024 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! 2 दिवस पाणी जपून वापरा, महापालिकेने सांगितलं यामागचं महत्त्वाचं कारण