Marathi Language: आपली मायबोली मराठी असली तरी हा इतिहास माहितीये का? कशी झाली निर्मिती?
- Reported by:Shivani Dhumal
- local18
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Marathi Language: मराठीवर वैदिक संस्कृती, बौद्धविचार, तसेच लोकसाहित्य या सर्वांचा प्रभाव असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे.
ठाणे: मराठी भाषा आणि मराठी साहित्याची व्याप्ती मोठी आहे. अनेक दिग्गज कवी आणि लेखकांनी मराठी भाषेमध्ये उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषा बोलण्याबाबत वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लोकल 18ने, मराठी भाषेचा नेमका इतिहास काय आहे? ही भाषा कधी पासून बोलली जाते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तसेच मुंबई विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. सतीश कामत यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. कामत म्हणाले की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून मराठी माणसाच्या जगण्याची आणि अस्मितेची अभिव्यक्ती आहे. मराठी भाषेला हजारो वर्षांचा वैभवशाली आणि गूढतेने परिपूर्ण असा इतिहास आहे.
मराठी ही इंडो-युरोपियन भाषा गटातील एकभाषा आहे. जगात स्पॅनिश, इंग्रजी, हिंदी, पोर्तुगीज, रशियन, जर्मन अशा मुख्य 20 ते 25 भाषा आहेत. त्यामध्ये मराठीची सुद्धा गणणा होते. मराठीवर वैदिक संस्कृती, बौद्धविचार, तसेच लोकसाहित्य या सर्वांचा प्रभाव असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र व गोव्याची अधिकृत भाषा देखील आहे. मध्यप्रदेशातही मराठीला द्वितीय अधिकारिक भाषा म्हणून मान्यता मिळालेली आहे. जगात मराठी मातृभाषा असणाऱ्यांची संख्या 15 कोटींच्या आसपास आहे. 113 पेक्षा जास्त देशांमध्ये मराठी भाषिक लोक आहेत, अशी माहिती डॉ. कामत यांनी दिली.
advertisement
डॉ. कामत पुढे असंही म्हणाले की, 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठीला 'अभिजात भाषे'चा दर्जा मिळाला. खरंतर या गोष्टीसाठी उशीरच झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी, रंगनाथ पाठक, हरी नरके, ज्ञानेश्वर मुळे, सदानंद मोरे अशा विद्वानांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या समितीचा अहवाल प्रभावी ठरला. या समितीने मराठी भाषा प्राचीन असल्याचे ठोस पुरावे सादर केले.
advertisement
डॉ. कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी भाषा सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे मराठीची प्राचीनता, श्रेष्ठता, सलगता आणि स्वयंभूपणा याचा संपूर्ण तर्क मिळतो. परिणामी मराठीला अभिजात भाषा म्हणून मान्यता मिळाली आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काही नवीन मुद्दे पुढे आले आहेत. अलीकडे जून्नर तालुक्यातील 'नाणेगाव'मध्ये एक शिलालेख आढळला आहे. ब्राह्मी लिपीतील शिलालेख अंदाजे 2300 वर्षे जुना आहे. अभ्यासकांच्या मते त्या शिलालेखावर मराठी वाक्याचे मिसळलेले स्वरूप आहे.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
Aug 03, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Marathi Language: आपली मायबोली मराठी असली तरी हा इतिहास माहितीये का? कशी झाली निर्मिती?









