तीन वेळा वाचली, चौथ्यांदा घात झाला; पवईतील गीता चौधरी हत्याकांडाला कशी फुटली वाचा?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गीताचा पती सखाराम चौधरी यानेच खुनाचा कट रचला होता. दुसऱ्या महिलेबरोबर संबंध असल्यामुळे तो पत्नीपासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता.
मुंबई : मुंबईत पोलिसांनी किचकट केस सोडवली. पवई परिसरात आत्महत्या वाटणाऱ्या एका महिलेच्या मृत्यूमागील मोठा कट पोलिसांनी उघड केला. पतीनेच पत्नीचा खून करून आत्महत्या भासवली होती. इतकंच नव्हे तर या आधी पतीने तीन वेळा पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने सहा लाखांची सुपारी दिली होती.
दीड वर्षांपूर्वी मुंबईत एका महिलेनं आत्महत्या केली होती. 14 ऑक्टोबर 2024 रोजी गीता चौधरी हिचा मृतदेह तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. आत्महत्या म्हणून या मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मात्र गीता यांच्या वडिलांना हे प्रकरण संशयास्पद वाटलं. त्यामुळे त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर मृतदेह पुन्हा बाहेर काढून तपासणी करण्यात आली. त्यात खुनाचा कट उघड झाला. फॉरेन्सिक तपासात गीताच्या गळ्यावर दोन वेगवेगळे मार्क्स आढळले. सामान्य आत्महत्येत असा प्रकार दिसत नाही. डॉक्टरांच्या मते, आधी गळा आवळून खून करण्यात आला आणि नंतर मृतदेहाला फाशी दिल्यासारखं टांगण्यात आलं होतं.
advertisement
तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी
फॉरेन्सिकच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी पुन्हा फाईल ओपन केली. नव्यानं तपास करताना एका पेक्षा एक धक्कादायक खुलासे झाले. गीताचा पती सखाराम चौधरी यानेच खुनाचा कट रचला होता. दुसऱ्या महिलेबरोबर संबंध असल्यामुळे तो पत्नीपासून दूर होण्याचा प्रयत्न करत होता. त्याने तब्बल 6 लाख रुपयांची सुपारी देऊन तीन जणांना खून करण्यासाठी तयार केलं होतं.
advertisement
कसं फुटलं बिंग?
गीताचा खून करण्यासाठी याआधी तीन वेळा प्रयत्न करण्यात आले. एकदा अंधाऱ्या रस्त्यावर चाकू हल्ला करण्याचा कट रचण्यात आला होता. दुसऱ्यांदा कारने धडक देऊन अपघात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर तिसऱ्यांदा ट्रेनमधून ढकलण्याचा कट आखण्यात आला होता.मात्र हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर 14 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारच्या वेळी घरात गीता चौधरी एकट्याच असताना आरोपी घरात घुसले आणि त्यांनी गळा दाबून खून केला. मृतदेह किचनमधील पंख्याला टांगून आत्महत्येचा बनाव करण्यात आला. घटनेनंतर मुलगा घरी आल्यावर हा प्रकार उघड झाला. मुलाने फोन केल्यानंतर पती सखाराम चौधरी घटनास्थळी आला. त्याने पोलिसांना आत्महत्येची माहिती दिली.
advertisement
सखाराम चौधरीसह चार जणांना अटक
गीताच्या वडिलांना आलेला संशय, त्यानंतर फॉरेन्सिक पुरावे आणि बँक व्यवहार यांच्या आधारे पोलिसानी सज्जड पुरावे गोळा करून सखाराम चौधरीसह चार जणांना अटक केली. आत्महत्येचा बनाव करून पचवलेला खून पोलिसांनी उघड करून गीताला न्याय दिला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 9:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तीन वेळा वाचली, चौथ्यांदा घात झाला; पवईतील गीता चौधरी हत्याकांडाला कशी फुटली वाचा?









