'10 कोटींची भरपाई द्या', ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीची ओमराजे निंबाळकरांना नोटीस
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तथा भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे.
बाळाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरण विधिमंडळ अधिवेशनात गाजत असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांना ड्रग्ज प्रकरणातील आरोपी तथा भाजपचे तुळजापूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद गंगणे यांनी अब्रूनुकसानीची नोटीस पाठवली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी चुकीचे आरोप केले त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मलीन होऊन बदनामी झाली, असे गंगणे यांच्या नोटीसीत म्हटलं आहे. ओमराजे निंबाळकरांनी सोशल मीडियावरून आरोपांचा व्हिडीओ मागे घ्यावा आणि सार्वजनिक माफी प्रसिद्ध करावी, असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे.
तसेच अब्रूनुकसानीच्या भरपाई पोटी 10 कोटी द्या. अन्यथा दिवाणी व फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करू असं म्हटलं आहे. विनोद गंगणे यांनी अॅड. अंगद पवार यांच्यामार्फत खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांना ही नोटीस पाठवली आहे.
वकील अंगद पवार यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना पाठवलेल्या नोटीसीत असे म्हटले आहे की, विनोद गंगणे हे तुळजापूर येथील राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती असून समाजात त्यांना मान आहे. त्यांच्याकडे तुळजापूर शहराच्या राजकारणातील महत्त्वाचा केंद्रबिंदु म्हणुन पाहतात. तामलवाडी येथील गुन्ह्यात त्यांना आरोपी केले आहे. छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन देताना काही बाबींचे निरीक्षण केले. त्यात गंगणे हे मादक पदार्थाचे ग्राहक आहेत, त्यांना ड्रग्ज व्यवहारातून आर्थिक लाभ झाला नाही. त्यामुळे ते पेडलर, तस्कर नाहीत. त्यांच्याकडून ड्रग्ज जप्त केले नाही. गंगणे यांनी तपासात केलेले सहकार्य आणि कोणताही गुन्हेगारी पूर्व इतिहास नसल्याची नोंद घेऊन आशिलास जामीन मंजुर केला आहे. ते ड्रग्ज तस्करीचे मास्टर माईंड व रॅकेटचा भाग नाहीत असा दावा केला आहे.
advertisement
त्यामुळे बदनामीकारक विधानांचा व्हिडीओ सोशल मीडियावरुन त्वरीत मागे घ्यावा आणि सार्वजनिक माफी प्रसिद्ध करावी. मानहानी, मानसिक वेदना व त्रासापोटी 10 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई 7 दिवसांच्या आत अदा करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात फौजदारी आणि दिवाणी खटला दाखल केला जाईल, नोटीसचा खर्च 15 हजार तुमच्याकडून वसूल केला जाईल, असंही नोटीसीत म्हटलं आहे.
advertisement
यावर खासदार ओमराजे निंबाळकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात विनोद गंगणे हा 38 आरोपी पैकी एक मुख्य आरोपी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. गंगणे याने स्वतःच्या आणि इतरांच्या नावाने लाखो रुपयांचे ड्रग्ज घेतले. त्याच्यामुळेच तुळजापुरात ड्रग्ज पसरले, असा त्याच्यावर आरोप आहे. याबाबत अद्याप दोषारोपपत्र गेले नाही. अजून पोलीस तपास सुरु आहे, कोर्टातील मुद्दे, पोलिसांनी जो तपास केला. त्यावर आधारित मी बोललो, नोटीसीला योग्य ते उत्तर देऊ, आता ही कायदेशीर प्रक्रिया आहे, असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
December 15, 2025 8:50 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'10 कोटींची भरपाई द्या', ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपीची ओमराजे निंबाळकरांना नोटीस











