सोन्याची अंगठी असो वा आयफोन… दानपेटीत चुकून पडताच ‘देवाचा’! तुळजाभवानी मंदिराचा वादग्रस्त फतवा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू ती चुकून पडलेली असली तरी परत देता येणार नाही, असा वादग्रस्त फतवा तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने काढला आहे.
पुणे : महाराष्ट्रातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. लाखो भाविक दरवर्षी येथे जातात. मात्र सध्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत असून त्यामुळे भाविक प्रचंड संतापले आहेत. पिंपरी-चिंचवड येथील भाविक सुरज टिंगरे यांच्यासोबत तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवी मंदिरात घडलेला प्रकार सध्या भाविकांमध्ये तीव्र संताप निर्माण करणारा ठरत आहे. देवीच्या दर्शनासाठी श्रद्धेने आलेल्या टिंगरे यांची सुमारे एक तोळ्याची सोन्याची अंगठी चुकून दानपेटीत पडली आणि त्यानंतर सुरू झालेला न्यायासाठीचा संघर्ष आजही अनुत्तरित आहे.
पिंपरीचे भाविक सुरज टिंगरे हे दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनावेळी दानपेटीत पैसे टाकताना हातातील सोन्याची अंगठी थेट दानपेटीत पडल्याचे टिंगरे यांच्या लक्षात आले. अंगठी दानपेटीत पडल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला. कोणत्या दानपेटीत, कोणत्या दिवशी व कोणत्या वेळी अंगठी पडली, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. संबंधित अंगठीचा फोटोही प्रशासनाकडे सादर करण्यात आला. इतकेच नव्हे तर सत्यता पडताळून अंगठी परत मिळावी, यासाठी मंदिर संस्थानकडे त्यांनी लेखी अर्जही दाखल केला.
advertisement
मंदिराने काय उत्तर दिले?
मात्र, दोन महिने उलटूनही अंगठी परत मिळण्याऐवजी मंदिर संस्थानने त्यांचा अर्ज थेट निकाली काढत धक्कादायक भूमिका घेतली. मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू ती चुकून पडलेली असली तरी परत देता येणार नाही, असे लेखी उत्तर सुरज टिंगरे यांना देण्यात आले. या निर्णयाने टिंगरे यांना मानसिक धक्का बसला असून, श्रद्धेच्या ठिकाणीच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
वादग्रस्त ठराव तात्काळ रद्द करावा, भाविकांची मागणी
या प्रकरणामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.. दानपेटी ही श्रद्धेचे प्रतीक असली तरी चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत न देणे हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे. तुळजाभवानी देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारचे संकट ओढवणे हे देवस्थानाच्या प्रतिमेला धक्का देणारे असल्याचे मत व्यक्त होत आहे. मंदिर संस्थानने हा वादग्रस्त ठराव तात्काळ रद्द करावा आणि संबंधित भाविकाला न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा हा प्रश्न केवळ एका अंगठीपुरता न राहता भाविकांच्या श्रद्धेचा गंभीर विषय बनेल, असा इशाराही दिला जात आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोन्याची अंगठी असो वा आयफोन… दानपेटीत चुकून पडताच ‘देवाचा’! तुळजाभवानी मंदिराचा वादग्रस्त फतवा









