मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा, दादांसाठी IPS नांगरे पाटलांची भावुक पोस्ट
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.
मुंबई : कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेले, कुशल प्रशासक, दिलेला शब्द पाळणारे आणि महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका सुसंस्कृत, अभ्यासू आणि विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाला मुकला आहे. भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. अजित पवार यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.
नांगरे पाटील काय म्हणाले?
अहिल्यानगरला एसपी असताना माझे राजकीय गणित जमत नव्हते. दादा पुण्याचे पालकमंत्री होते. अचानक दादांचा फोन आला. तुमची पुणे ग्रामीणला एसपी म्हणून शासन नेमणूक करीत आहे. जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावं लागेल. माझा आणि दादांचा पूर्वीचा परिचय नव्हता. पोस्टिंग झाली. अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग केल्या. दादांचा कोणासाठीही फोन नाही. आयजी म्हणून नेमणुकीस असताना चाकण, तळेगाव, मुळशी भागातील २५ गँगला मोका लावला, १५० च्या वर गुन्हेगारांना तडीपार केले, दादांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केले. एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिमम महाराष्ट्राचा आयजी म्हणून ३ वर्षे काम करताना कोणत्या चुकीच्या बाबीसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा माझा अनुभव नाही. दादा नेहमी अदबीने बोलायचे. अहो नांगरे पाटील आणि नंतर आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव आणि फोनवर 'ऐका ना' असे आर्जव आणि प्रेमाने साद घालायचे.
advertisement
अजितदादांच्या कामाची पद्धत पद्धतशीर आणि शिस्तबद्द! मी एकदा पोलीस क्रीडास्पर्धांसाठी त्यांना निमंत्रित केले होते. खेळ संपल्यानंतर त्यांनी पंचाला तू जीन्स पॅन्टला उभी इस्त्री का केलीस म्हणून झाप झाप झापले. परिसराची स्वच्छता आणि टापटीपीवर त्यांची बारीक नजर असायची. बारामती पोलीस स्टेशनची इमारत बांधायची चालू असताना ते किमान डझन वेळा साईटवर आले असतील. पीओडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा अत्युत्तम राहील याच्या सक्त सूचना होत्या. कंत्राटदारानेही थोडीसुद्धा रिस्क न घेता फाईव्ह स्टार ठाणे बनवले. उद्घाटनावेळी चकाचक लॉक अप आणि त्यासमोरचे लश ग्रीन लॉन पाहून दादा मिश्किलीने म्हणाले, 'आयला गडबड झाली. आता चोरांना या अशा पॉश लॉक अप मध्ये ठेवले तर ते बेल मागणारच नाहीत. आपल्याला त्यांना फुकट पोसावं लागेल.'
advertisement
दादा दिसायला बोलायला कडक पण अत्यंत संवेदनशील होते. भोर जवळच्या धरणात गावकऱ्यांची बोट उलटून २७ जण मृत्युमुखी पडले होते. दादा भेट द्यायला आले तेव्हा त्यानी शासकीय निधीची वाट न पाहता त्या २७ कुटुंबियांना जागेवरच प्रत्येकी २ लाख मदत केली. कार्यकर्त्यांच्या मोहोळात ते राणी माशीसारखे शिस्तीने काम करायचे. त्यांचा मी जिम मध्ये किंवा रनिंग करीत असताना भेटायला यायला निरोप यायचा. मी अनेकदा जिमच्या पेहरावात गेस्ट हाऊस ला सकाळी ६/७ वाजता पोहोचायचो. एकदा मला रागाने फोन केला अहो तुम्ही हे हायवे वरचे डिव्हायडर सगळे जोडून घेतले. गावातल्या लोकांचे धाबे आहेत, छोटे मोठे धंदे आहेत. सगळे बंद पडताहेत. मी दादांना डिव्हायडर बेकायदेशीर तोडल्याने किती आणि कसे अपघात झाले आणि ते जोडल्यावर फेटल अपघात किती कसे कमी झाले, याचे प्रेझेन्टेशन दिले. त्यांनी जाहीर सभेत माझे कौतुक केले आणि मुख्य सचिवांना फोन करून असा ड्राईव्ह पूर्ण राज्यात घ्यायच्या सूचना दिल्या.
advertisement
पुण्याला एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रंगात आलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केल्याबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टानच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जाहीर सन्मान केला आणि ड्रग्जची पुण्यातील कीड मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश दिले. मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा असणाऱ्या या लोकनेत्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण होती, दीनदलितांविषयी लळा होता, विकासाची दूरदृष्टी होती. खूप तपें लागतात असे प्रगल्भ नेतृत्व तयार व्हायला आणि नियती क्रूर झाली की क्षणात होत्याचे नव्हते होते. आजची सकाळ अशा महाराष्ट्राला चटका लावणाऱ्या दादांच्या एक्सिट ने झाली. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! आदरांजली
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 12:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनाचा हळवा, शिस्तीचा कडवा, स्वभावाने मावळा, दादांसाठी IPS नांगरे पाटलांची भावुक पोस्ट









