Wardha : 'बाबा माझी ऍडमिशन करा'... मुलीच्या हट्टासमोर हतबल बाप हरला, 12वीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
मी बारावीमध्ये आहे, माझी ऍडमिशन करा, असं हट्ट सोनियाने धरला, यानंतर वडिलांनी तिला काही वेळ थांबण्याचा सल्ला दिला, पण वडिलांचा हा सल्ला न ऐकताच सोनियाने स्वत:चं आयुष्य संपवलं.
नरेंद्र मते, प्रतिनिधी
वर्धा : मी बारावीमध्ये आहे, माझी ऍडमिशन करा, असं हट्ट सोनियाने धरला, यानंतर वडिलांनी तिला काही वेळ थांबण्याचा सल्ला दिला, पण वडिलांचा हा सल्ला न ऐकताच सोनियाने स्वत:चं आयुष्य संपवलं. वडिलांकडे पैसे नसल्याने या विद्यार्थिनीने गळफास लावून घेतला. वर्धा जिल्ह्यातील लोनसावळी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.
एकीकडे मोफत शिक्षणाचा गाजावाजा केला जात असतानाच दुसरीकडे वडिलांच्या आर्थिक अडचणींमुळे बारावीचा प्रवेश रखडल्याने मुलीने टोकाचं पाऊल उचललं. वर्ध्यातल्या पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणसावळी गावामध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सोनिया वासुदेव उईके असं या मुलीचं नाव असून ती 17 वर्षांची आहे.
advertisement
वर्धा तालुक्यातील लोणसावळी येथे वासुदेव उईके हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. वासुदेव शेतमजुरीचे काम करून आपली उपजीविका चालवतात, तसंच त्यांचा मुलगा सुद्धा कामावर जातो. वासुदेव यांची 17 वर्षांची मुलगी सोनिया ही वर्ध्याच्या न्यू इंग्लिश महाविद्यालयात कॉमर्स विभागात शिकत होती, तसंच ती वर्ध्याच्या आदिवासी शासकीय वसतीगृहात राहत होती.
सोनियाचा अकरावीचा अभ्यासक्रम एप्रिल महिन्यात पूर्ण झाला, त्यानंतर ती गावात वडिलांकडे आली. तसंच ती सण वारालाही घरी यायची. बारावीमध्ये गेल्याने आणि शाळा सुरू झाल्याने ती वडिलांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह करत होती, पण वडील आर्थिक अडचणीत होते. तू काही दिवस हॉस्टेलमध्ये राहा मी पैशांची व्यवस्था करून प्रवेश करतो, असं त्यांनी सोनियाला सांगितलं. मात्र अशातच आई, वडील, भाऊ कामावर गेल्यानंतर घरी कुणीच नसल्याची संधी साधत तिने आयुष्य संपवलं.
advertisement
वडिलांकडे पैसे नसल्याने सोनिया हताश झाली होती, त्यामुळे तिने बाथरूमच्या टिनच्या एँगलला दोरीने गळफास लावून घेतला. वडील कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना समोरचे दार उघडे दिसले. वडिलांनी पाहणी केली असता त्यांना घरात कुणी दिसले नाही, यानंतर त्यांचा मुलगाही कामावरून आला. बाथरूममध्ये गेला असता त्याला सोनियाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुलगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
July 06, 2025 10:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Wardha : 'बाबा माझी ऍडमिशन करा'... मुलीच्या हट्टासमोर हतबल बाप हरला, 12वीच्या विद्यार्थिनीने आयुष्य संपवलं