सप्त खंजिरीच्या प्रबोधन परंपरेचा महाराष्ट्र सरकारकडून गौरव, कोण आहेत भाऊसाहेब थुटे?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्ध्यातील सप्त खंजिरी व प्रबोधनाचा आवाज महाराष्ट्रभर पोहोचला असून भाऊसाहेब थुटे यांना सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
वर्धा, 15 नोव्हेंबर: महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार वर्ध्यातील प्रबोधन कीर्तनकार भाऊसाहेब थुटे यांना लोककला पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. नोकरीबरोबरच कीर्तन-भजन आणि सप्तखंजिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, वृक्षारोपण यांसारख्या अनेक विषयांवर सामाजिक जनजागृतीचे कार्य ते अविरतपणे करित आहेत. थुटे हे आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजात वेगवेगळ्या विषयांवर सत्य आणि सद्यपरिस्थितीवर प्रबोधन करत आहेत. हा पुरस्कार म्हणजे राष्ट्रसंतांच्या विचारांचा सत्कार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
30 वर्षांपासून सप्त खंजिरीवादन करून प्रबोधन
इंजिनीयर भाऊसाहेब थुटे हे गेल्या 30 वर्षांपासून सप्त खंजिरी वादन करून राष्ट्रसंतांचे विचार समाज मनात पेरून समाज प्रबोधन करत आहेत. समाजातील वेगवेगळ्या समस्या आणि वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष वेधून जनजागृतीचा प्रयत्न सप्तकंजीरी वादन कलेच्या माध्यमातून केला जातोय. थुटे यांना बालपणापासून सप्त खंजिरीचे आकर्षण आणि आवड होती मात्र वयाच्या अंदाजे 27- 28 वर्षापासून सप्त खंजिरी वादन करून प्रबोधनाचा विडा त्यांनी उचलला. भविष्यात देखील सप्ताह खंजिरीच्या आणि प्रबोधनाच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून राष्ट्रसंतांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.
advertisement
ही दखल राष्ट्रसंतांच्या विचारांची
"महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक विभागाचा लोककला पुरस्कार सप्त खंजिरी मुळे मला प्रदान झाला त्यामुळे मी शासनाचे आभार व्यक्त करतो. माझ्या कार्याची दखल म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची दखल आहे" असेही त्यांनी सांगितले. ही कला सत्यपाल महाराजांनी सुरू केली असून महाराष्ट्रात आता अंदाजे 30 - 35 सप्तकांजिरी वादक असल्याचे त्यांनी सांगितले. या कलेच्या माध्यमातून कीर्तनाला एक वेगळाच रंग येतो आणि तरुण पिढी याकडे जास्त आकर्षित होतात, असे थुटे यांनी बोलताना सांगितले.
advertisement
सप्त खंजिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे भाऊसाहेब थुटे यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातच आता महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या या लोककला पुरस्काराची भर पडली असून समाजातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
November 15, 2023 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
सप्त खंजिरीच्या प्रबोधन परंपरेचा महाराष्ट्र सरकारकडून गौरव, कोण आहेत भाऊसाहेब थुटे?