MAHA SET Exam 2025: 'खर्रा आणि दारू मिळाली तर शाळेत येईल' म्हणणाऱ्या योगेशने सेट परीक्षा केली पास
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
SET Exam: फासे पारधी समाजातील योगेशला लहानपणीच खर्रा आणि दारूचं व्यसन लागलं होतं. त्याला शाळेची देखील फारशी आवड नव्हती.
अमरावती: आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या आयुष्यावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा या गावात जन्मलेल्या योगेश सोबतही असंच घडलं. फासे पारधी समाजातील योगेशला लहानपणीच खर्रा आणि दारूचं व्यसन लागलं होतं. त्याला शाळेची देखील फारशी आवड नव्हती. पण, त्यानंतर 'प्रश्नचिन्ह' संस्थेचे मतीन भोसले त्याच्या आयुष्यात आले आणि त्याला नवीन दिशा मिळाली. कधीकाळी व्यसनात अडकलेल्या योगेशने आता अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
योगेश मंजू पवार याच्याशी लोकल18 ने संवाद साधला. योगेशने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा जन्म फासे पारधी समाजात झाला. अनेक जण फासे पारधी समाजाला गुन्हेगार समजतात. अगदी ब्रिटिशांनी देखील या समाजाला चोरचं संबोधलं होतं. शिकार हा या समाजाचा प्रमुख व्यवसाय आहे. योगेश देखील आई आणि वडिलांसोबत तितर, बाट्या या पक्षांची शिकार करत होता. त्याने गावातच इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेतलं. पण, नियमित शाळेत जाण्याऐवजी त्याला आई-वडिलांबरोबर काम करण्यात जास्त रस होता. फार लहान वयात त्याला खर्रा आणि दारूचं व्यसन देखील लागलं होतं.
advertisement
आपल्या आयुष्यातील परिवर्तनाबद्दल बोलताना योगेश म्हणाला, "एक दिवस आमच्या गावात प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेचे संचालक मतीन भोसले सर आले होते. त्यांनी मला विचारलं, बाळा तू शाळेत जातोस का? मी नकारार्थी उत्तर दिलं आणि मला शाळा आवडत नसल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले आमच्या शाळेत येतोस का? तिथे तुला नवीन कपडे, पुस्तकं आणि आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू आम्ही देऊ. सर, मी जर तुमच्या शाळेत आलो, तर तुम्ही मला दोन वेळ खर्रा आणि दारू देणार का? असा उलट प्रश्न मी त्यांना केला होता. माझ्या प्रश्नाला होकार देऊन ते मला सोबत घेऊन गेले."
advertisement
प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रम शाळेत गेल्यानंतर मतीन भोसलेंनी योगेशचं मतपरिवर्तन केलं. गोष्टींच्या माध्यमातून त्याला अनेक बाबी पटवून दिल्या. 'फासे पारधी समाज हा आधीच व्यसनाधीन आहे. त्यामागे अनेक अंधश्रद्धा देखील आहेत. या परिस्थितीवर मात करत शिक्षणाची कास धरली तर आयुष्यात यश मिळेल,' अशी शिकवण योगेशला मिळाली.
आश्रम शाळेत असताना योगेश टिव्हीवर योगासने बघत असे. त्यातून त्यालाही योग साधनेची आवड लागली. शाळेत त्याला योग शिक्षकांचं मार्गदर्शन देखील लाभलं. योगेशने विभाग आणि राज्यस्तरीय योगासन स्पर्धा देखील गाजवल्या. मात्र, कंबरेचं ऑपरेशन झाल्यापासून योगेशची योगसाधना बंद झाली.
advertisement
योगेश इयत्ता 10वीत असताना परिक्षेच्या वेळी त्याचं ऑपरेशन झालं होतं. तरी देखील त्याने जिद्दीने परिक्षा दिली आणि 80 टक्के गुण मिळवले. बारावीत 85 टक्के गुण मिळवून उच्च शिक्षणासाठी जळगाव गाठलं. पदवी मिळवून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावा, अशी योगेशची इच्छा होती. म्हणून पदवी घेऊन त्याने अमरावती येथील शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याठिकाणी त्याने अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डिग्री घेतली आणि सेट परिक्षा दिली. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये योगेशला अपयश आलं. मात्र, 2025 मध्ये त्याने अर्थशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच्या यशात मतीन भोसले यांचा मोठा वाटा असल्याचं योगेशने सांगितलं.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
September 08, 2025 4:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MAHA SET Exam 2025: 'खर्रा आणि दारू मिळाली तर शाळेत येईल' म्हणणाऱ्या योगेशने सेट परीक्षा केली पास