PM Modi Address to Nation: नवरात्रीपासून देशात ‘GST बचत उत्सव’, सर्वसामान्यांना थेट फायदा- मोदींची घोषणा
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
PM Modi Address to Nation: नरेंद्र मोदी यांनी २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन GST सुधारणा आणि GST बचत उत्सव जाहीर केला. या बदलामुळे वस्तू स्वस्त होतील, बचत वाढेल आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेल्या संदेशात उद्यापासून (२२ सप्टेंबर) लागू होणाऱ्या माल आणि सेवा कर (GST) सुधारणा या “पुढील पिढीतील सुधारणा” असल्याचे सांगितले. या सुधारणा भारताच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले, उद्यापासून दोन उत्सव सुरू होत आहेत – नवरात्रोत्सव आणि GST बचत उत्सव. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देश ‘आत्मनिर्भर भारत’ या उद्दिष्टाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. सूर्योदयासोबत पुढील पिढीच्या GST सुधारणा लागू होतील. याच वेळी ‘GST बचत उत्सव’ सुरू होईल, ज्यामुळे तुमची बचत वाढेल.”
advertisement
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की- हा बदल केवळ किंमती कमी करण्यापुरता मर्यादित नाही. तर नवे रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि गुंतवणुकीला चालना देणारा आहे. या सुधारणेमुळे मध्यमवर्गाची बचत वाढेल, तरुणांना लाभ होईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पूर्वीच्या गुंतागुंतीच्या कररचनेवर भाष्य
मोदी यांनी २०१७ मधील GST अंमलबजावणीची आठवण करून दिली. त्यांनी म्हटले, २०१७ मध्ये भारताने GST सुधारणेला सुरुवात केली, तेव्हा इतिहास बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. दशकेभर देशातील नागरिक आणि व्यापारी विविध करांच्या जाळ्यात अडकले होते. ऑक्ट्रॉय, एन्ट्री टॅक्स, सेल्स टॅक्स, अबकारी, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स—अशा असंख्य करांचा गुंता देशात होता. एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवताना असंख्य तपासणी नाके पार करावे लागत.
advertisement
गरीब आणि नवमध्यमवर्गासाठी दुहेरी आनंद
पंतप्रधानांनी सांगितले की गरीब आणि नवमध्यमवर्गीय कुटुंबांना या सुधारण्यांमुळे दुहेरी आनंद मिळणार आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता आता अधिक सोपी होईल. या सुधारणा देशाच्या विकासकथेला वेग देतील, गुंतवणूक आकर्षक करतील आणि सर्व राज्यांना विकासाच्या स्पर्धेत समान भागीदार बनवतील, असे मोदी म्हणाले.
advertisement
भाजपचा ‘GST बचत उत्सव’
पंतप्रधानांच्या घोषणेनंतर भाजपने सात दिवसांचा GST बचत उत्सव सोमवारपासून साजरा करण्याची घोषणा केली आहे. पक्षाच्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन उत्सवी वातावरण निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २९ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक खासदार व कार्यकर्ते दररोज सकाळ-संध्याकाळ बाजारपेठेत पदयात्रा काढून दुकानदारांना भेटतील, त्यांना फुले देऊन शुभेच्छा देतील. “गर्वाने म्हणा, हे स्वदेशी आहे” असे लिहिलेली फलक दुकानदारांना वाटले जातील.
advertisement
दोन टप्प्यातील नवी रचना
GST परिषदेनं या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ५६व्या बैठकीत अप्रत्यक्ष करव्यवस्थेत मोठा बदल जाहीर केला आहे. कररचना सोपी करणे, खप वाढवणे आणि दर तर्कसंगत करण्यासाठी नवा दोन-स्तरीय ढाचा निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
नवे दर : ५% आणि १८% असे दोन मुख्य टप्पे राहतील.
विशेष कर : अत्यंत महागड्या व ‘सिन गुड्स’ (लक्झरी/हानीकारक वस्तू) साठी ४०% दंडात्मक दर ठेवला जाईल.
अंमलबजावणीची तारीख : नवा ढाचा २२ सप्टेंबरपासून लागू होईल.
परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकमताने या सुधारणा मंजूर केल्या आहेत.
ग्राहकांना थेट फायदा
२२ सप्टेंबरपासून अनेक आवश्यक वस्तू स्वस्त होणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळेल. FMCG पासून ऑटोपर्यंत अनेक क्षेत्रांनी कमी GST चा फायदा ग्राहकांना देण्याची घोषणा आधीच केली आहे. यामुळे सणासुदीच्या काळात खरेदी वाढण्याची शक्यता आहे.
किचनमधील दैनंदिन वापराच्या वस्तू जसे की तूप, टोमॅटो केचप, कॉफी, पनीर, तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि औषधे यांसारख्या अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत.
मोदींनी शेवटी देशवासीयांना शुभेच्छा देत म्हटले, या सणासुदीच्या काळात प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढेल. पुढील पिढीच्या GST सुधारणांसाठी आणि ‘बचत उत्सवा’साठी देशातील सर्व कुटुंबांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 5:41 PM IST
मराठी बातम्या/मनी/
PM Modi Address to Nation: नवरात्रीपासून देशात ‘GST बचत उत्सव’, सर्वसामान्यांना थेट फायदा- मोदींची घोषणा