Success Story : कामासाठी लाजला तो संपला! इंजिनिअर बनला मच्छीवाला, महिन्याची कमाई तर पाहाच
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
निलेश साळी या तरुणाने कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीवर पाणी सोडत मत्स्य राज या नावाने घरोघरी ताजे मासे पोहोचवण्याचा आगळावेगळा व्यवसाय उभा केला आहे.
मुंबई: नोकरी करायची म्हटलं की ती कोणत्या दर्जाची आहे, ऑफिसमध्ये बसून करण्याची आहे की रस्त्यावर उभं राहून करण्याची, याचा खरा कामगार कधी विचार करत नाही. काम लहान-मोठं नसतं; मेहनत मोठी असते. जो माणूस कामाला प्रतिष्ठा देतो, तो कोणत्याही क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करू शकतो. अशीच जिद्द दाखवत गोरेगावमधील निलेश साळी या तरुणाने कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरीवर पाणी सोडत मत्स्य राज या नावाने घरोघरी ताजे मासे पोहोचवण्याचा आगळावेगळा व्यवसाय उभा केला आहे.
निलेश हा पेशाने साउंड इंजिनिअर असून त्याचे शिक्षण बी.कॉमपर्यंत झाले आहे. लॉकडाऊनच्या आधी त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली आणि त्याने काम सुरू केले. मात्र काही दिवसांतच लॉकडाऊन जाहीर झाला. कंपनीत पंधरा दिवस काम आणि पंधरा दिवस सुट्टी अशी परिस्थिती निर्माण झाली. सुट्टीच्या काळात घरी बसून काय करायचे, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला. तेव्हा त्याने मित्राचा टेम्पो घेऊन गोरेगाव परिसरात मासे विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो घाऊक बाजारातून किंवा उपलब्ध ठिकाणांहून मासे आणून विक्री करायचा. साधारण पाच हजार रुपयांचे मासे घेऊन त्यातून एक ते दोन हजार रुपयांपर्यंत नफा मिळत होता. ही केवळ वेळ घालवण्याची सुरुवात होती पण त्यातून त्याला बाजारपेठ, ग्राहकांची गरज आणि माशांची गुणवत्ता याचा चांगला अनुभव मिळाला.
advertisement
लॉकडाऊन संपल्यानंतर त्याने पुन्हा पूर्णवेळ नोकरीकडे वळण्याचा निर्णय घेतला. मात्र काही कारणांमुळे सहा महिन्यांपूर्वी त्याची कंपनीच बंद पडली आणि नोकरी गमावली. दुसरी नोकरी शोधण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निश्चय त्याने केला. आपल्याला ताजे मासे कसे ओळखायचे, ग्राहकांना नेमकी काय गरज असते, हे माहिती आहे; मग याच क्षेत्रात का उतरू नये? असा विचार त्याच्या मनात आला आणि मत्स्य राज या नावाने घरोघरी फ्रेश मासे डिलिव्हरी करण्याचा व्यवसाय सुरू झाला.
advertisement
या व्यवसायाची खासियत म्हणजे ग्राहकांच्या ऑर्डरनुसार थेट त्यांच्या दारात ताजे मासे पोहोचवणे. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी तो ऑर्डर घेतो. प्रत्येक ऑर्डरनुसार तो पहाटे साडेतीन वाजता उठून भाऊचा धक्का किंवा ससून डॉक येथे जातो आणि ताजे मासे खरेदी करतो. ग्राहकांना मासे कापून हवे असतील तर तेही स्वच्छ करून देतो, अन्यथा पूर्ण मासेही पोहोचवतो. गुणवत्ता आणि ताजेपणावर त्याचा विशेष भर असतो.
advertisement
सुरुवातीला प्रतिसाद मर्यादित होता. एक-दोन ऑर्डर मिळाल्या तरी तो खचला नाही. सातत्य, प्रामाणिकपणा आणि वेळेचे काटेकोर पालन यामुळे हळूहळू ग्राहकांचा विश्वास वाढू लागला. आज त्याच्यासोबत दोन मदतनीस काम करत आहेत. गोरेगावपुरता मर्यादित असलेला हा व्यवसाय आता वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईन तसेच दक्षिण मुंबईपर्यंत पोहोचला आहे. सहा महिन्यांत त्याने चांगला ग्राहकवर्ग तयार केला असून, महिन्याला सुमारे 35 ते 40 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहे.
advertisement
कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणाने मासे विक्रीचा व्यवसाय सुरू करणे काहींना आश्चर्यकारक वाटू शकते. मात्र निलेशने कामात कधीही भेदभाव केला नाही. कामाला कमीपणा नसतो, हे त्याने कृतीतून दाखवून दिले. प्रतिष्ठेपेक्षा प्रामाणिकपणा आणि मेहनत महत्त्वाची, हे त्याच्या प्रवासातून स्पष्ट होते. मत्स्य राजच्या माध्यमातून त्याने केवळ स्वतःसाठी रोजगार निर्माण केला नाही, तर इतर दोन तरुणांनाही कामाची संधी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 27, 2026 5:05 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : कामासाठी लाजला तो संपला! इंजिनिअर बनला मच्छीवाला, महिन्याची कमाई तर पाहाच








