मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, प्रवास सुस्साट होणार! 5 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी खजिना खुला!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sitraj Ramesh Parab
Last Updated:
BMC Budget 2025: मुंबईकरांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमचा मिटणार असून प्रवास सुस्साट होणार आहे. 5 मोठ्या प्रकल्पांसाठी बीएमसीने खजिना खुला केला आहे.
मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच आयुक्त भूषण गगराणी यांनी जाहीर केला. यामध्ये पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात आला आहे. यात 5 मोठ्या प्रकल्पांना भरघोस निधी दिला असून त्याचा मुंबईकरांना फायदा होणार आहे. यामध्ये रस्ते खड्डेमुक्त करणे, पुलांची डागडुजी, कोस्टल रोड, दहिसर भाईंदर लिंक रोड आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच 7 एसटीपी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. मरिन ड्राइव्ह ते वांद्रे-वरळी सागरी किनारा मार्ग खुला झाल्यानंतर यातील वाहनतळ आणि 70 हेक्टर हरित क्षेत्रासह विविध कामे केली जाणार आहेत
मरीन ड्राइव्ह ते वरळी कोस्टल रोड (1507 कोटी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यान 10.58 किलोमीटर लांबीच्या सागरी मार्गाचे उद्घाटन केले. या प्रकल्पावर जवळपास 14 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. बीएमसीने 2025-26 च्या बजेटमध्ये यासाठी अजून 1507 कोटींची तरतूद केली आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे आयुक्त गगराणी यांनी सांगितले. तसेच ही रक्कम कोस्टल रोडची देखरेख, सुरक्षा, फायर स्टेशन बनवण्यासह इतर कामांवर खर्च करण्यात येईल, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
advertisement
वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड (4 हजार कोटी)
कोस्टल रोडच्या विस्तारीकरणात 22 किलोमीटर अंतराच्या वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडची निर्मिती करण्यात येणार आहे. हा मार्ग 6 टप्प्यांत बनवण्यात येणार आहे. त्यासाठी 4 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आलीये. दहिसर ते मीरा-भाईंदरपर्यंत (कोस्टल रोडचा अंतिम टप्पा) या मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. अर्थसंकल्पात यासाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गगराणी यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसर अंतर 30-40 मिटिनांत पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
advertisement
गोरेगांव-मुलुंड लिंक रोड (1958 कोटी)
पश्चिम मुंबईला पूर्व मुंबईसोबत जोडणाऱ्या गोरेगांव-मुलुंड लिंक रोडसाठी अर्थसंकल्पात 1958 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. या प्रकल्पाचे काम 4 टप्प्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलैला मुंबई दौऱ्यात गोरेगाव ते मुलुंड प्रस्तावित ट्विन टनलची पायाभरणी केली होती. गोरेगाव – मुलुंड रोडच्या तिसऱ्या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून ट्विन टनेल निर्णाण करण्यात येणार आहे. यामुळे भूसंपादनाचा खर्च वाचणार आहे. सांताक्रुझ-चेंबूर, अंधेरी-घाटकोपर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडनंतर गोरेगांव-मुलुंड लिंक रोड बनवण्यात येणार असून हा मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणार आहे. हा 12.20 किलोमीटर लांबीचा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
advertisement
समुद्र प्रदुषण मुक्त करण्यासाठी STP प्रकल्प (5545 कोटी)
दूषित सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी बीएमसी 7 एसटीपी प्रकल्पांवर काम करत आहे. 2026 ते 2028 या काळात हे 7 प्रकल्प बनवण्यात येणार आहे. यासाठी बीएमसीने अर्थसंकल्पात 5 हजार 545 कोटींची तरतूद केलीये. जुलै 2026 मध्ये वर्सोवा, ऑगस्ट 2026 मध्ये भांडुप, जुलै 2027 मध्ये बांद्रा, वरळी आणि धारावी प्रकल्प तर सर्वात शेवटी जुलै 2028 मध्ये मालाड एसटीपी प्रकल्प पूर्ण होण्याचे लक्ष्य आहे. एकूण 26 हजार कोटींच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी 2023 मध्ये केले होते.
advertisement
जून 2026 पर्यंत पूर्ण करणार रस्त्याची कामं (3111 कोटी)
मुंबईतील रस्ते सिमेटंचे करण्याची योजना बीएमसीने हाती घेतली आहे. 2050 किलोमीटरपैकी 1333 किलोमीटर सिमेंटचे रस्ते करण्याचे काम पूर्ण झाले आहे. बीएमसीने उर्वरित रस्त्यांपैकी पहिल्या टप्प्यात 698 किलोमीटरमधील 324 किमीचे काम जानेवारी 2023 मध्ये सुरू केले. त्यातील 187 रस्ते (26 टक्के काम) पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील 1420 रस्त्यांचे (377 किमी) काम पूर्ण करण्यात येणार आहे. यात 720 रस्त्यांचे काम डिसेंबर 2024 मध्ये सुरू करण्यात आले आहे. बीएमसीने पहिल्या टप्प्यातील 75 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील 50 टक्के काम जून 2025 च्या पूर्वी पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. तर दोन्ही टप्प्यातील संपूर्ण काम जून 2026 च्या पूर्वी पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 05, 2025 12:54 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार, प्रवास सुस्साट होणार! 5 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी खजिना खुला!