CSMT Train Update: गुड न्यूज! सीएसटीवरून गाडी सुटली की थेट वेळेवर घरी; प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय
- Reported by:Namita Suryavanshi
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Mumbai Local Update : सीएसटीवरून सुटणाऱ्या लोकल गाड्या आता अधिक वेळेवर धावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई लोकल प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि तणावमुक्त होणार आहे.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या मेल गाड्यांमुळे होणारा उशीर आणि त्याचा फटका लोकल प्रवाशांना बसण्याचे दिवस लवकरच संपण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेने या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सीएसएमटी येथे थांबणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या पुढील काळात लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळताच बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सीएसएमटीवरील गर्दी आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा ताण निर्माण होतो. विशेषतहा उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या उशिरा दाखल होत असल्याने लोकल सेवांवर त्याचा थेट परिणाम होतो. सीएसएमटीकडे येणाऱ्या एक्सप्रेसची संख्या मर्यादित केल्यास लोकलसाठी अधिक वेळ आणि ट्रॅक उपलब्ध होईल असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे.
advertisement
मार्गिकेअभावी लोकल मार्गावर वळणाऱ्या एक्सप्रेस
कल्याणहून मुंबईच्या दिशेने येताना विद्याविहार-कुर्ला भागापर्यंत सहावी मार्गिका उपलब्ध असल्याने एक्सप्रेस गाड्या त्या टप्प्यापर्यंत स्वतंत्र मार्गावरून येतात. मात्र पुढे सीएसएमटीपर्यंत स्वतंत्र मार्ग नसल्याने या एक्सप्रेस गाड्यांना लोकल मार्गावर वळवावे लागते. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडते, गाड्या उशिरा धावतात आणि प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.
एलटीटीकडे वळवल्यास सकाळचा गोंधळ टळणार
हीच अडचण दूर करण्यासाठी काही एक्सप्रेस गाड्यांचे संचलन सीएसएमटीऐवजी एलटीटी येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या गाड्या विद्याविहार परिसरातून थेट एलटीटीच्या दिशेने वळतील आणि सकाळच्या सत्रात मुख्य मार्गावर होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल.
advertisement
पंचवटी एक्सप्रेससह काही गाड्यांचा प्रस्तावात समावेश
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावामध्ये पंचवटी एक्सप्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. कोणत्या गाड्या एलटीटीवर हलवण्यात येणार, याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर जाहीर केला जाणार आहे.
लोकलसाठी अधिक ट्रॅक, अधिक वेळेवर सेवा
या बदलामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत किमान तीन लोकल गाड्यांसाठी अतिरिक्त ट्रॅक उपलब्ध होणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे लोकल गाड्यांचे संचलन अधिक नियमित होईल आणि प्रवाशांना होणारा नाहक त्रास कमी होईल.
advertisement
मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा
रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर हा बदल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात उतरल्यास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लाखो लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि मुंबईतील रेल्वे वाहतूक अधिक सुसूत्र होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 8:43 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
CSMT Train Update: गुड न्यूज! सीएसटीवरून गाडी सुटली की थेट वेळेवर घरी; प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय









