Manoj Tiwari: ११ लाखांवर डल्ला, भाजप खासदार मनोज तिवारीच्या घरी चोरी, आरोपीला पाहून बसला धक्का
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
दिल्लीचे भाजप खासदार, सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि लोकप्रिय गायक मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी चोरी झाली आहे.
मुंबई: दिल्लीतील भाजपचे खासदार आणि सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि लोकप्रिय गायक मनोज तिवारी यांच्या घरी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मुंबईतील घरी ही चोरी झाली. अंधेरी पश्चिम येथील शास्त्री नगर परिसरातील सुंदरबन अपार्टमेंटमध्ये ही चोरीची घटना झाली आहे. मनोज तिवारी यांच्या घरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका माजी कर्मचाऱ्याने चोरी केल्याची माहिती मिळत आहे. मनोज तिवारी यांचा मॅनेजर प्रमोद जोगिंदर पांडे यांनी अंबोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी कारवाई केली आणि जलद तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
मनोज तिवारी यांच्या घरामध्ये, त्या चोरट्याने डुप्लिकेट चाव्यांचा वापर करून, तिजोरी उघडून त्यामध्ये असलेली लाखो रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. अंबोली पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेंद्र कुमार दीनानाथ शर्मा असं असून तो तिवारी यांच्याकडे सुमारे दोन वर्षे काम करत होता आणि त्या नंतर त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद पांडे गेल्या 20 वर्षांपासून मनोज तिवारी यांच्याकडे मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मनोज तिवारी यांच्या घरातील बेडरूममधून एकूण 5,40,000 रूपयांची रोकड चोरीला गेली होती. धक्कादायक म्हणजे, जून 2025 मध्ये एका कपाटातून 4,40,000 रुपयेही गायब झाले होते, परंतु त्यावेळी चोराबद्दल कोणताही सुगावा लागला नाही.
advertisement
वारंवार घरातील लाखो रूपयांची रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, डिसेंबर 2025 मध्ये घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. परिणामी, 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 9 वाजता, सीसीटीव्ही अलर्टमध्ये माजी कर्मचारी सुरेंद्र कुमार शर्मा घरात चोरी करताना दिसला. फुटेजमध्ये आरोपीकडे घराच्या, बेडरूमच्या आणि कपाटांच्या डुप्लिकेट चाव्या असल्याचे स्पष्टपणे दिसून आले, ज्यामुळे तो अगदी सहज घरात येऊ शकला. पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, आरोपीने 15 जानेवारी रोजी अंदाजे एक लाख रुपये चोरले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पोलिसांनी चोराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली. त्या चौकशीअंती त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला औपचारिकरित्या अटक केली. सध्या, पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत आणि संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 2:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Manoj Tiwari: ११ लाखांवर डल्ला, भाजप खासदार मनोज तिवारीच्या घरी चोरी, आरोपीला पाहून बसला धक्का










