Mumbai High Court: 'लोकांना खड्डेमुक्त रस्ते द्या, नाहीतर भरपाई देत राहा', हायकोर्टाने पालिकांना फटकारलं!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सर्वच महानगर पालिकांना रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या भुयारी गटारीसंबंधित घटनांबद्दल महानगरपालिकांना चांगलेच फटकारले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (15 डिसेंबर) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील सर्वच महानगर पालिकांना रस्त्यावरील खड्डे आणि उघड्या भुयारी गटारीसंबंधित घटनांबद्दल महानगरपालिकांना चांगलेच फटकारले आहे. मुंबई उच्च न्यायालय म्हणाले की, महानगरपालिकांना दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता येत नसतील तर आम्ही त्यांना त्या कशा योग्य प्रकारे पार पडायच्या हे सांगू. त्यामुळे जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा. नाही तर, भरपाई देत राहा, अशा शब्दांमध्येच मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईसह ठाणे आणि पालघर भागातील महानगर पालिकांना फटकारले.
खड्डे आणि उघड्या भुयारी गटारींमुळे होणाऱ्या दुखापतींच्या आणि मृत्यूसंबंधीच्या अनेक याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने मत मांडले की, "जर तुम्ही तुमचे घर व्यवस्थित ठेवले नाही तर आम्हाला त्यावर कारवाई करावी लागेल. जर तुम्हीच तुमचे घर व्यवस्थित ठेवले नाही तर तुम्हाला नुकसान भरपाई भरावी लागेल. तुम्ही महानगरपालिका आहात, तुम्हाला आपल्या शहरात कशापद्धतीने साफसफाई होते, याची खात्री करणं हे तुमचे काम आहे." या जनहित याचिकेत मध्यस्थी करणाऱ्या अधिवक्त्या रुजू ठक्कर आहेत. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, "वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या अशा अनेक घटनांचे मी तपशील पाहत होते, ज्याची दखल महानगरपालिकांनी स्वतः घ्यायला हवी होती. ज्या त्यांनी घेतलेल्या नाहीत."
advertisement
ठक्कर यांनी अलिकडेच ठाण्यातील धर्मवीर नगर येथील ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ तब्बल 20 फूट खोल असलेल्या उघड्या पावसाच्या पाण्याच्या खड्ड्यात पडून एका दोन वर्षांच्या मुलाला दुखापत झाल्याच्या घटनेकडे लक्ष वेधले. त्यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील एका घटनेचा उल्लेख केला, एका व्यक्तीची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यात आदळल्याने त्याच्या पाठी बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ड्रायव्हर जखमी झाला. ड्रायव्हरच्या पाठी बसलेल्या व्यक्तीला ट्रकने चिरडले, घटनास्थळीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. घटनास्थळी असलेल्या अनेक लोकांनी सांगितले की, त्या व्यक्तीच्या दुचाकीचा खड्ड्यात आदळल्यानंतर तोल गेला, ज्यामुळे एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक असलेले महेश देसाई हे दुचाकीच्या मागे जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आले.
advertisement
खराब रस्ते, खड्डे किंवा उघड्या भुयारी गटारींमुळे जर नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असेल तर, घटनेचे कारण शोधण्यासाठी योग्य ती तपासणी करून भरपाई दिली जाईल आणि जबाबदार असलेल्यांना शिक्षा केली जाईल. याची खात्री करण्यासाठी सर्व महानगरपालिकांनी समित्या स्थापन केल्या आहेत, असे न्यायालयाने नमूद केले. मुंबईत झालेल्या अशाच एका रस्त्याच्या अपघातातील मृत्यूचा संदर्भ देत, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) बाजू मांडणारे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात खड्ड्यामुळे नव्हे तर डंपरला झालेल्या धडकेमुळे झाला आहे. पुढील सुनावणीत सर्व तपशील प्रतिज्ञापत्रात समाविष्ट केले जातील असे आश्वासन त्यांनी खंडपीठाला दिले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 5:51 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai High Court: 'लोकांना खड्डेमुक्त रस्ते द्या, नाहीतर भरपाई देत राहा', हायकोर्टाने पालिकांना फटकारलं!










