Mumbai News: 75 मिनिटांचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत, मुंबईत होतोय गेमचेंजर प्रकल्प, प्लॅन काय?
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: मुंबईतील गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होईल.
मुंबई : मुंबईतील महत्त्वाकांक्षी गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आता या प्रकल्पाचा चौथा आणि अंतिम टप्प्याचे काम होत आहे. या टप्प्यात नाहूर ते ऐरोलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 1,293 कोटी रुपयांची निविदा जाहीर करण्यात आली आहे.
नाहूर ते ऐरोली दरम्यान सुमारे 1.33 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार असून, या मार्गावर मुंबई व ठाण्याला जोडणारी अत्याधुनिक इंटरचेंज व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे, या उड्डाणपुलामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबई या चारही दिशांना सिग्नलविना थेट जोड मिळणार असल्याने हा प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.
advertisement
ऐरोली येथे केबल-स्टेड तंत्रज्ञानावर आधारित उड्डाणपूल उभारण्यात येणार असून संपूर्ण काम दोन टप्प्यांत पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोलीदरम्यानचा मुख्य उड्डाणपूल उभारला जाईल, तर दुसऱ्या टप्प्यात चार प्रमुख इंटरचेंज ठाणे-नाहूर, ऐरोली-ठाणे, मुंबई-ऐरोली आणि दक्षिण मुंबई-ऐरोली विकसित करण्यात येतील.
advertisement
दरम्यान, 12.2 किमी लांबीचा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मुलुंड येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे यांना थेट जोडणार आहे. या प्रकल्पामुळे सध्या सुमारे 75 मिनिटांचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. सुमारे ₹14,000 कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे मुंबईत पूर्व–पश्चिम दिशेतील कनेक्टिव्हिटी लक्षणीयरीत्या सुधारणार आहे.
या प्रकल्पात दिंडोशी न्यायालयाजवळील 1.2 किमी लांबीचा उड्डाणपूल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील जुळ्या बोगद्यांचे काम, तसेच फिल्म सिटी परिसरात बोगदा बोरिंग मशीनद्वारे उभारण्यात येणारे द्विन बोगदे यांचा समावेश आहे. अंतिम टप्प्यात मुलुंड परिसरात लूप आणि अंडरपाससह भव्य क्लोव्हरलीफ इंटरचेंज उभारले जाणार आहे.
advertisement
एकूणच, गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: 75 मिनिटांचा प्रवास अवघ्या 25 मिनिटांत, मुंबईत होतोय गेमचेंजर प्रकल्प, प्लॅन काय?







