मंदिराच्या पुजाऱ्याला लुटलं पण नंतर घडला 'चमत्कार'; 2 तासांत परत मिळाले त्याचे 12 लाख
- Published by:Priya Lad
Last Updated:
स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने पुजाऱ्याला एका ठिकाणी बोलावण्यात आलं. तिथं चोरट्यांनी त्याचे पैसे गायब केले. पण ते त्यांनी पुन्हा आणून दिले.
विनय दुबे आणि विजय वंजारा/प्रतिनिधी, मुंबई : कांदिवलीत चोरट्यांनी एका मंदिराच्या पुजाऱ्याला लुटलं. 42 वर्षांच्या पुजार्याने बाईकच्या डिक्कीत ठेवलेली सुमारे सव्वाबारा लाखांची कॅश अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी सायंकाळी पळवून नेली. पण पण यानंतर दोन तासांतच जणू चमत्कारच घडला. पुजाऱ्याचे सर्व पैसे त्याला परत मिळाले. नेमकं घडलं काय ते पाहुयात.
मोहनराज लल्लाराम मिश्रा असं या पुजाऱ्याचं नाव आहे. ते मालाडच्या मालवणी, जुलेशवाडी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मालवणीतील शिव मंदिरातील पुजारी म्हणून काम करतात. जानेवारी 2024 रोजी त्यांची हुसैन अख्तर आणि बिट्टू खान यांच्याशी ओळख झाली होती. या दोघांनीही त्यांना बिल्डरच्या ओळखीतून कांदिवलीतील एसआरए इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचं आश्वासन दिलं होतं.
advertisement
काही दिवसांनी त्यांनी त्यांना एसआरएचा एक फ्लॅट असून तो 35 लाखांपर्यंत देतो असं सांगून त्यांना कांदिवलीत बोलावून घेतलं होतं. याच फ्लॅटच्या चर्चेसाठी मंगळवारी 27 फेब्रुवारीला दुपारी दीड वाजता ते कांदिवलीत आले होते. यावेळी त्यांनी त्यांची बाईक गरुडा बारसमोर पार्क केली होती. या दोघांची भेट घेतल्यानंतर त्यांनी फ्लॅटची किंमत जास्त असून आपण 25 लाख रुपये देऊ शकतो असं सांगितलं. त्यापैकी त्यांना 15 लाख कॅश तर 10 लाख चेक स्वरुपात देण्याचं मान्य केलं. तसंच पैशांसाठी काही दिवसांची अवधी मागवून घेतली होती. काही वेळानंतर ते डिक्कीत ठेवलेले 12 लाख 30 हजार रुपये घेण्यासाठी गेले होते. मात्र बाईकच्या डिक्कीत पैसे नव्हते. अज्ञात चोरट्याने डिक्कीतील पैसे चोरी करून पळून गेले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता.
advertisement
त्यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मोहनराज मिश्रा यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा दिवसाढवळ्या आणि गजबलेल्या परिसरात घडल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना पोलिसांनी बरकतउल्ला खान, राजेश सिंग आणि मोहम्मद अख्तर हुसैन या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला. राजेशने त्यांच्या बाईकच्या डिक्कीतील रक्कम चोरी करून बरकतउल्ला आणि मोहम्मद अख्तरला दिली होती. त्यानंतर या तिघांनी ही रक्कम आपसांत वाटून घेऊन तिथून पलायन केलं होतं. चोरीची साडेसहा लाखांची रकम बरकतअलीकडून पोलिसांनी जप्त केली आहे.
advertisement
कांदिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितलं की, कांदिवली इराणी वाडी येथील रहिवासी राजेंद्र सिंह यांनी पुजाऱ्याला कांदिवली स्टेशन रोडवरील एका घरात फ्लॅट दिला होता. त्यांनी त्याला एका मांसाहारी हॉटेलमध्ये बोलावलं होतं. जेव्हा पुजाऱ्याने त्या हॉटेलमध्ये जाण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी बहाणा करून पुजाऱ्याला दुसऱ्या व्हेज हॉटेलमध्ये नेलं आणि पुजाऱ्याची गाडी हॉटेलपासून दूर उभी ठेवली. राजेंद्रचा दुसरा मित्र तिथं उभा होता. पुजाऱ्यापासून काही अंतरावर स्कूटरमध्ये ठेवलेले 12 लाख 30 हजार रुपये लुटून ते पळून गेले.
advertisement
कांदिवली पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपींना जेरबंद केलं. अटकेनंतर त्यांना बुधवारी दुपारी बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्यांतील उर्वरित रक्कम लवकरच हस्तगत केली जाणार आहे. या चोरीमागे त्यांच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. रॉबरीचा गुन्हा नोंद होताच अवघ्या काही तासांत तिन्ही आरोपींना चोरीच्या साडेसहा लाखांच्या रकमेसहित अटक केली. तिघंही कांदिवलीतील रहिवाशी आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 29, 2024 12:08 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मंदिराच्या पुजाऱ्याला लुटलं पण नंतर घडला 'चमत्कार'; 2 तासांत परत मिळाले त्याचे 12 लाख


