मुंबई–गोवा Highwayवर ‘गेमचेंजर’ अपडेट, प्रवाशांचा त्रास कधी संपणार? 6 टर्निंग पॉईंट, समोर आली नवी डेडलाईन
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Mumbai–Goa National Highway: मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडले असून, प्रवाशांचा रोजचा त्रास अजूनही कमी झालेला नाही. फ्लायओव्हर आणि बायपासचे अपूर्ण काम, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे लोकांना तासन्तास प्रवासात अडकावे लागत आहे.
मुंबई : मुंबई आणि कोकणाला जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या (NH-66) रुंदीकरणाचे काम गेली अनेक वर्षे रखडलेलेच आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे प्रवास सुलभ होईल आणि मुंबई ते गोवा अंतर सहा तासांत पार करता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र सध्या सुरू असलेल्या चार उड्डाणपुलांचे (फ्लायओव्हर्स) आणि दोन बायपास रस्त्यांचे अपूर्ण काम यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा विलंबाच्या गर्तेत अडकला आहे.
advertisement
या महामार्गाचे दोन पदरी रस्त्यापासून चार पदरी रस्त्यात रूपांतर करण्याचे काम 2013 साली सुरू झाले होते. यातील पणवेल–कासू–इंदापूर हा सुमारे 84 किलोमीटरचा टप्पा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या मार्फत करण्यात आला असून, तो जवळपास पूर्ण झाला आहे. या भागात वाहनचालकांना तुलनेने सुरळीत आणि आरामदायी प्रवास करता येत आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या मते इंदापूरच्या पुढेच मुंबई–गोवा वाहतुकीच्या खऱ्या अडचणी सुरू होतात.
advertisement
इंदापूर ते झरप (Zarap) हा सुमारे 470 किलोमीटरचा लांब पल्ल्याचा टप्पा थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) यांच्या अखत्यारीत आहे. या टप्प्यातील सर्वात मोठे अडथळे म्हणजे इंदापूर बायपास (सुमारे 3 किमी) आणि माणगाव बायपास (सुमारे 7 किमी). हे दोन्ही बायपास मूळ करारात समाविष्ट होते, मात्र वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे मंत्रालयाला सुमारे सहा महिन्यांपूर्वी नव्याने निविदा काढाव्या लागल्या. सध्या या बायपासचे काम सुरू झाले असले; तरी ते मार्च 2027 पूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
advertisement
या विलंबाचा थेट परिणाम प्रवासाच्या वेळेवर होत आहे. सहा तासांत पूर्ण होईल असा दावा करण्यात आलेला मुंबई–गोवा प्रवास सध्या 8 ते 9 तासांचा होत आहे. विशेषतः इंदापूर आणि माणगाव परिसरात वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पीक अवर्समध्ये ही परिस्थिती अधिकच गंभीर होते. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब असल्याने प्रवाशांची गैरसोय वाढत आहे.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तात्पुरता दिलासा देण्यासाठी इंदापूर आणि माणगावमधील विद्यमान रस्ते रुंद करण्यात आले आहेत. मात्र स्थानिक वाहनांची आणि बाहेरून येणाऱ्या वाहतुकीची टक्कर होत असल्याने शहरांच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर जाम होतो, अशी तक्रार वाहनचालकांकडून होत आहे.
advertisement
माणगावच्या पुढे परिस्थिती तुलनेने सुधारते. परशुराम घाट ते झरप हा टप्पा जवळपास पूर्णत्वास आला असून, या भागात रस्त्याचे रुंदीकरण वेगाने झाले आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, निवळी, पाली आणि संगमेश्वर या चार ठिकाणी सुरू असलेल्या उड्डाणपुलांचे काम गेल्या जवळपास दोन वर्षांपासून मुंबई–गोवा वाहतुकीवर परिणाम करत आहे. प्रत्येकी सुमारे 800 मीटर लांबीचे हे उड्डाणपूल अद्याप अपूर्ण आहेत. MoRTH अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे सर्व उड्डाणपूल मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर वाहतूक या पुलांवरून सुरू होईल.
advertisement
मात्र अधिकाऱ्यांनी हेही स्पष्ट केले की, संपूर्ण महामार्गाची अवस्था एकसारखी खराब नाही. वाहतूक कोंडी प्रामुख्याने ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या भागांपुरतीच मर्यादित आहे. उड्डाणपुलांच्या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी यासाठी सेवा रस्ते (सर्व्हिस रोड्स) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
MoRTH चे मुंबई विभागीय अधिकारी आणि या प्रकल्पाचे प्रमुख प्रशांत फेगडे यांनी सांगितले, “चार उड्डाणपूल आणि दोन बायपास वगळता, सध्या देखील पणवेल ते गोवा हा प्रवास आठ ते नऊ तासांत करता येतो.”
दरम्यान या महामार्गाच्या समस्यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले तेव्हा, चैतन्य पाटील नावाच्या एका अभियंत्याने 470 किलोमीटर लांबीच्या मुंबई–गोवा महामार्गावर तब्बल 29 दिवसांची पायी पदयात्रा केली. या प्रवासादरम्यान त्यांनी रस्त्यावरील त्रुटी, धोकादायक ठिकाणे आणि संभाव्य उपाययोजना यांचे सविस्तर दस्तऐवजीकरण केले. हा सविस्तर अहवाल त्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला. ज्यामुळे या प्रकल्पातील विलंब आणि अडचणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 11:30 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबई–गोवा Highwayवर ‘गेमचेंजर’ अपडेट, प्रवाशांचा त्रास कधी संपणार? 6 टर्निंग पॉईंट, समोर आली नवी डेडलाईन










