Mumbai News: वर्सोवा ते दहिसर सुसाट, ‘तो’ अडथळा दूर, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला गती
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai News: वर्सोवा ते दहिसर दरम्यान सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा सागरी किनारा मार्ग सहा टप्प्यांत उभारला जाणार आहे.
मुंबई : पश्चिम उपनगरांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्ग अखेर वेगाने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पातील सीआरझेड क्षेत्रातील कामांसाठी आवश्यक असलेली वन विभागाची मंजुरी मिळाल्याने दीर्घकाळ रखडलेली कामे आता सुरू होणार आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रकल्पाला गती मिळण्यास मदत होणार आहे.
सीआरझेडमुळे अडलेली कामे
वर्सोवा-दहिसर सागरी मार्गाच्या काही भागांत मोठ्या प्रमाणात कांदळवने आणि झाडे असल्याने सीआरझेड अंतर्गत विविध परवानग्या आवश्यक होत्या. इतर सर्व मंजुरी मिळाल्या असल्या तरी वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे या क्षेत्रातील कामे थांबली होती. महापालिकेच्या भूखंडावरील काही ठिकाणची कामे सुरू होती, मात्र सीआरझेड क्षेत्रातील कामे रखडली होती.
advertisement
मुंबई महापालिकेला अखेर वन विभागाची आवश्यक मंजुरी मिळाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. या मंजुरीनंतर सीआरझेड क्षेत्रातील कामे लवकरच सुरू करण्यात येणार असून, इतर ठिकाणी कामे आधीपासून सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सहा टप्प्यांत उभारला जाणार प्रकल्प
वर्सोवा ते दहिसर दरम्यान सुमारे 22 किलोमीटर लांबीचा हा सागरी किनारा मार्ग सहा टप्प्यांत उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 16 हजार 621 कोटी रुपये इतका आहे. काही भागांत दुहेरी उन्नत मार्ग तर काही ठिकाणी खाडीखालून बोगद्याद्वारे हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे.
advertisement
पश्चिम-पूर्व द्रुतगती मार्गांना जोडणी
या सागरी मार्गाला गोरेगाव-मुलुंड लिंक रोडची जोड दिली जाणार असून, त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवरील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच वर्सोवा-दहिसर सागरी मार्गाला दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे.
हा सागरी किनारा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. मरिन ड्राइव्ह ते वरळी सागरी मार्गानंतर आता वर्सोवा ते दहिसर प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 8:53 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: वर्सोवा ते दहिसर सुसाट, ‘तो’ अडथळा दूर, गेमचेंजर प्रकल्पाच्या कामाला गती










