Mumbai News: गर्भवती मुलीला स्वत:च्या कुटुंबाकडून धमक्या, प्रकरण कोर्टात पोहोचलं; उच्च न्यायालयाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
बॉयफ्रेंडसोबत लव्ह मॅरेज करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या 31 वर्षीय गर्भवती महिलेला संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयने नुकतेच मुंबई पोलिसांना दिले आहेत.
मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बॉयफ्रेंडसोबत लव्ह मॅरेज करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या 31 वर्षीय गर्भवती महिलेला संरक्षण देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयने नुकतेच मुंबई पोलिसांना दिले आहेत. अल्पसंख्यांक समुदायातील ही महिला असून तिला सतत तिच्या पालकांकडून आणि नातेवाईकांकडून येणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर या महिलेने पोलिस संरक्षणाची मागणी न्यायालयाकडे केली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्याम चंडक यांच्या अध्यक्षतेखाली ही केस लढली जात आहे.
दोन्हीही न्यायमूर्तींनी दिलेल्या आदेशामध्ये स्पष्ट केले की, ही महिला प्रौढ असून तिच्या कुटुंबाने तिच्या नातेसंबंधाला मान्यता दिली नसली तरीही तिला तिच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. 31 वर्षीय गर्भवती महिलेच्या वडिलांनी हेबियस कॉर्पस (सबंधित व्यक्तीला आहे त्या स्थितीत सादर करण्याची विनंती) याचिका केली होती. त्यासोबतच मुलीच्या वडिलांनी आपली मुलगी एप्रिल महिन्यापासून बेपत्ता असल्याचा दावा करून तिला हजर करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. परंतु, ही याचिकाही खंडपीठाने महिलेला पोलीस संरक्षणाचे आदेश देताना निकाली काढली.
advertisement
त्यापूर्वी 31 वर्षीय गर्भवती महिलेच्या वडिलांनी केलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर त्या महिलेलाही न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी, तिचे कुटुंब अडथळे निर्माण करत असल्याने आणि तिचे नातेसंबंध स्वीकारत नसल्याने तिने स्वतःच्या इच्छेने घर सोडले होते, असं या गर्भवती महिलेने न्यायालयाला सांगितले. सध्या ती तीन महिन्यांची गर्भवती असून तिने आपल्या जोडीदारासोबत लग्न करून स्थायिक व्हायचे आहे, अशी इच्छाही महिलेने न्यायालयाकडे व्यक्त केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली. ही महिला सज्ञान आहे आणि तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. शिवाय, तिला काय करायचे आहे याबाबतची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात घेता याचिकाकर्त्याने केलेली याचिका प्रलंबित ठेवली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने महिलेला दिलासा देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.
advertisement
नातेसंबंधांमुळे महिलेला तिच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याची भीती तिने न्यायालयाकडे व्यक्त केली. तसेच, पोलिस संरक्षणाची मागणी केली. त्यामुळे, वाकोला पोलिसांनी ही महिला सध्या राहत असलेल्या परिसरातील स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आणि तिचे संरक्षण सुनिश्चित करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. महिलेच्या वडिलांनी एप्रिलमध्ये वाकोला पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तथापि, याचिकाकर्त्याची मुलगी तिच्या जोडीदारासह महाराष्ट्राबाहेर राहत आहे. तिचे पालक आणि नातेवाईक तिच्या नात्याविरुद्ध असल्याने महिलेने त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता, असेही प्राथमिक चौकशीत उघड झाले होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: गर्भवती मुलीला स्वत:च्या कुटुंबाकडून धमक्या, प्रकरण कोर्टात पोहोचलं; उच्च न्यायालयाचे पोलिसांना महत्त्वाचे आदेश


