Navi Mumbai Airport Routes : नवी मुंबई विमानतळावर कसं जायचं? मुंबई, ठाण्यातून थेट मार्ग, तुमच्या कामाची बातमी!
Last Updated:
Navi Mumbai International Airport : येत्या काही दिवसांत तुम्हीही जर नवी मुंबई विमानतळावरुन प्रवास करायचा विचार करता. तर जाणून घ्या तिथे जाण्यासाठी कोणता मार्ग वापरणे बरे राहिल.
नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील डी.बी. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार असून या विमानतळामुळे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड आणि आसपासच्या उपनगरांतील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, एक प्रश्न असा की या विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी कोणते मार्ग नागरिकांनी वापरावेत. चला तर ते एकदा सविस्तर जाणून घेऊयात.
'या' रस्त्यावरून विमानतळ गाठणे होणार सोपे
विमानतळ गाठण्यासाठी सध्या जे रस्ते मार्ग उपलब्ध आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. मात्र, सध्या काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था असल्यामुळे प्रवासाला अंदाजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
1. ठाणे परिसरातील प्रवाशांसाठी
मार्ग: पूर्व द्रुतगती महामार्गाचा वापर करून पुढे मुलुंड-ऐरोली मार्ग किंवा कळवा-दिघा मार्ग वाहनचालकांना निवडावा लागेल. मग तिथून ठाणे-बेलापूर रोड मार्गे बेलापूर-उलवे रस्त्यावरून विमानतळ गाठता येईल.
advertisement
अंतर आणि वेळ: ठाण्यातील कापूरबावडीपासून अंदाजे 35 ते 40 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे या प्रवासाला साधारणपणे एक ते सव्वा तास लागू शकतो.
2. दक्षिण मुंबईतील प्रवाशांसाठी
मार्ग: दक्षिण मुंबईतील वरळी किंवा त्या भागातून अटल सेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक - MTHL) मार्गे उलवे-बेलापूर रस्त्यावरून विमानतळावर पोहोचणे सर्वात सोपे आणि जलद असू शकते.
advertisement
अंतर आणि वेळ: हे अंतर फक्त 34ते 35 किलोमीटर असून प्रवासासाठी केवळ एक तास लागू शकतो.
3. पश्चिम उपनगरातील प्रवाशांसाठी
मार्ग: वाहनचालकांना पश्चिम द्रुतगती महामार्ग वापरून जेव्हीएलआर मार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावर यावे लागेल. तसेच पुढे वाशी खाडी पूल ओलांडून उलवेमार्गे विमानतळ गाठावे लागेल.
अंतर आणि वेळ: अंदाजे 40 ते 45 किलोमीटरचा हा मार्ग वाहतूक कोंडीमुळे पूर्ण करण्यासाठी दीड तासाहून अधिक वेळ लागू शकतो.
advertisement
4. नवी मुंबईतील रहिवाशांसाठी
मार्ग: ऐरोली, दिघा किंवा नेरूळ-बेलापूर भागातून पाम बीच रोड वापरून थेट बेलापूर-उलवे मार्गावर जाता येते.
अंतर आणि वेळ: हे अंतर सर्वात कमी म्हणजे 20 ते 25 किलोमीटर आहे, त्यामुळे विमानतळ साधारणपणे पाऊण तासात गाठता येऊ शकते.
5. वसई, पालघर आणि कल्याण परिसरातील प्रवाशांसाठी
वसई, पालघर, मिरा रोड या भागातून वाहनचालकांना फाऊंटन, गायमुख, घोडबंदर-ठाणे मार्गे येऊन पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ठाणे-बेलापूर रोडने विमानतळ गाठावे लागेल. हा प्रवास 50 ते 60 किलोमीटरचा असून सुमारे दोन ते अडीच तास लागू शकतात.
advertisement
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागातून शिळफाटा किंवा महापे रोड मार्गे विमानतळावर जाता येते. हा प्रवास सुमारे 60 ते 70 किलोमीटरचा असल्याने अडीच तास किंवा त्याहून जास्त वेळ लागू शकतो.
भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा
सध्या रस्त्यावर वाहनचालकांना काही समस्यांना सामोरे जावे लागले असले तरी येणाऱ्या काही वर्षांत नवी मुंबई विमानतळ गाठणे खूप सोपे होईल कारण या मार्गात मोठे प्रकल्प पूर्ण होत आहेत
advertisement
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. NMIA येथे बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक असेल, ज्यामुळे थेट विमानतळावर उतरणे शक्य होईल.
मेट्रो लाईन ८: ही प्रस्तावित मेट्रो मार्गिका मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील या दोन्ही विमानतळांना थेट जोडणार आहे.
जल मार्गिका: भविष्यात जल टॅक्सी किंवा जलवाहतुकीचे इतर मार्गही उपलब्ध होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवासाला एक नवा पर्याय मिळेल.
advertisement
हे सगळे पर्याय सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल आणि ठाणे, मुंबई तसेच रायगड, पालघर भागातील नागरिकांचा प्रवास जलद, सोपा आणि आरामदायक होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 9:01 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Navi Mumbai Airport Routes : नवी मुंबई विमानतळावर कसं जायचं? मुंबई, ठाण्यातून थेट मार्ग, तुमच्या कामाची बातमी!