निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, महागाई भत्त्यात केली वाढ
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई : निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. 1 जानेवारी ते 30 जून 2024 पर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
मार्च महिन्यात वाढीव वेतन मिळणार :
गुरुवारी 7 मार्च 2024 रोजी कॅबिनेटची बैठक झाली ज्यात महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे. महागाई भत्ता वाढल्याने कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं वाढीव वेतन येणार आहे. यासह मागील दोन महिन्याचा वाढीव भत्ता देखील मार्च महिन्याच्या पगारात दिला जाण्याची शक्यता आहे. सरकारने पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्याने जवळपास 68 लाख पेन्शनधारकांना देखील याचा फायदा होणार आहे.
advertisement
असा मिळेल वाढीव महागाई भत्त्याचा लाभ :
समजा कोणत्या कर्मचाऱ्याचा पगार हा महिना 50 हजार असेल. ज्यावर त्याला पूर्वी 46 टक्के म्हणजेच 23 हजार इतका महागाई भत्ता मिळत होता. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर त्यांना 50 टक्के म्हणजेच 25 हजार इतका महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना वर्षागणिक 14 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
advertisement
तसेच जर कोणत्या कर्मचाऱ्याला महिना 1 लाख रुपये पगार असेल ज्यावर त्याला पूर्वी 46 टक्के इतका महागाई भत्ता म्हणजेच 46 हजार रुपये मिळायचे. परंतु आता यात वाढ झाल्याने अशा कर्मचाऱ्याला 50 हजार रुपयांचा भत्ता मिळेल. म्हणजेच महिन्याला त्यांचा पगार 4 हजारांनी वाढणार आहे.
सध्या महागाई भत्ता हा जानेवारी ते जून या महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. परंतु लोकसभा निवडणुकांनंतर नवीन सरकार जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 07, 2024 8:00 PM IST