Lawrence Bishnoi Gang : हे आहेत लॉरेन्स बिश्नोई गँगचे 5 खतरनाक गँगस्टर, ज्यांच्या दहशतीची जगभरात चर्चा
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
लॉरेन्स बिश्नोई स्वतः तुरुंगात आहे, पण त्याच्या गँगचे सदस्य दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सिद्दिकी यांच्यावर शनिवारी (12 ऑक्टोबर) रात्री मुंबईत गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी कुप्रसिद्ध लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. लॉरेन्स बिश्नोई स्वतः तुरुंगात आहे; पण त्याच्या गँगचे सदस्य सतत खून आणि खंडणीचे गुन्हे करत आहेत. ही गँग देशातील विविध भागांत गुन्हे करत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याच्या हत्येमुळे सरकार आणि प्रशासनाला धक्का बसला आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगमधील पाच सदस्य सर्व गुन्हेगारी घटनांचं प्लॅनिंग करतात.
रोहित गोदारा: गँगस्टर रोहित हा बिश्नोई गँगचा महत्त्वाचा सदस्य आहे. त्याने राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. रोहित गोदारा हा राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील लुंकरण येथील रहिवासी आहे. त्याच्या नावावर 32 हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो गेल्या 13 वर्षांपासून गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. त्याने राजस्थानमधील व्यावसायिकांकडून 5 कोटी ते 17 कोटी रुपयांपर्यंत खंडणी वसूल केलेली आहे. त्याच्यावर सीकरमधील गँगस्टर राजू ठेहाटच्या खुनाचाही आरोप आहे. पंजाबी गायक सिद्धु मूसेवाला खून प्रकरणातही त्याचं नाव पुढे आलं होतं. सध्या तो कॅनडामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
गोल्डी ब्रार: सतींदरसिंग उर्फ गोल्डी ब्रार हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा निकटवर्तीय मानला जातो. युवक काँग्रेसचे नेते गुरलाल पहेलवान यांच्या हत्येमध्ये गोल्डीचा हात असल्याचा आरोप आहे. गोल्डीने पंजाबी गायक आणि काँग्रेस नेता सिद्धु मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. 29 मे 2022 रोजी पंजाबमधील मानसा येथे मूसेवालाचा खून झाला होता. मूळचा पंजाबमधील मुक्तसर येथील रहिवासी असलेला गोल्डी 2021पासून कॅनडामध्ये राहत आहे. त्याचे वडील शमशेरसिंग हे पंजाब पोलीस दलात सहाय्यक उपनिरीक्षक होते. 2021 मध्ये एका हत्या प्रकरणात गोल्डीचं नाव आल्याने शमशेरसिंग यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली होती.
advertisement
काला जठेडी: हा लॉरेन्स बिश्नोई गँगमधील महत्त्वाचा सदस्य आहे. तो हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील जठेडी गावातील रहिवासी आहे. कालावर खून, अपहरण, दरोडा, खंडणी, जमिनीवर कब्जा यांसारख्या अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत. त्याची दहशत पाहून हरियाणा पोलिसांनी त्याच्या नावावर सात लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काला 12वी पास असून या पूर्वी त्याने केबल ऑपरेटर म्हणून काम केलं होतं. काही काळानंतर तो गुन्हेगारी जगाकडे वळला. 2004 मध्ये त्याच्यावर चेनस्नॅचिंगचा पहिला गुन्हा दाखल झाला होता.
advertisement
अनमोल बिश्नोई: लॉरेन्स बिश्नोई गँगने बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी घेतली होती. गँगस्टर अनमोल बिश्नोईने हे काम केल्याचा आरोप होता. या घटनेनंतरच तो प्रकाशझोतात आला होता. अनमोल बिश्नोई उर्फ भानू हा सिद्धु मूसेवाला प्रकरणात देखील आरोपी आहे. गेल्या वर्षी एनआयएने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र, तोपर्यंत तो बनावट पासपोर्ट बनवून देशाबाहेर पळून गेला होता. तो सतत आपलं ठिकाण बदलतो. गेल्या वर्षी तो केनियामध्ये दिसला होता.
advertisement
कपिल सांगवान: लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये कपिल सांगवानचं नाव वेगाने प्रसिद्ध झालं आहे. सांगवान हा इंडियन नॅशनल लोक दल (INLD) हरियाणा युनिटचे अध्यक्ष नफेसिंग राठी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड आहे. 32 वर्षांचा सांगवान हा मूळचा दिल्लीतील नजफगढ भागातील आहे. त्याच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगवान हा खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडा आणि शस्त्रास्त्र कायद्यासारख्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे. त्याच्यावर दिल्लीत 18 गुन्हे दाखल आहेत.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
October 14, 2024 12:32 PM IST
मराठी बातम्या/देश/
Lawrence Bishnoi Gang : हे आहेत लॉरेन्स बिश्नोई गँगचे 5 खतरनाक गँगस्टर, ज्यांच्या दहशतीची जगभरात चर्चा