पंतप्रधानांनी एआय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी साधला संवाद
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोक कल्याण मार्ग निवासस्थानी एआय क्षेत्रातील सीईओ व तज्ञांशी संवाद साधून इंडिया एआय इम्पॅक्ट समिटसाठी धोरणात्मक सहकार्य व नवकल्पना यावर चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी लोक कल्याण मार्ग येथील आपल्या निवासस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी संवाद साधला.
या संवादाचा उद्देश फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या आगामी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या अनुषंगाने धोरणात्मक सहकार्य वाढवणे, एआय नवकल्पना जाणून घेणे आणि भारताच्या एआय मिशनची उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेला गती देणे हा होता. या संवादादरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एआय तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर होण्याच्या ध्येयाला जोरदार पाठिंबा व्यक्त केला. भारताला एआय क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रणी बनवण्यासाठी सरकार जे प्रयत्न आणि संसाधने वापरत आहे, त्याचीही त्यांनी प्रशंसा केली.
advertisement
पंतप्रधानांनी सर्व क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची आणि त्याचा उपयोग राष्ट्रीय विकासासाठी करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रमुख क्षेत्रांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहनही केले.
आगामी एआय इम्पॅक्ट समिटबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी सांगितले की, सर्व व्यक्ती आणि कंपन्यांनी नवीन संधी शोधण्यासाठी तसेच विकासाच्या मार्गावर मोठी झेप घेण्यासाठी या परिषदेचा लाभ घ्यावा. त्यांनी असेही सांगितले की, यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) द्वारे भारताने आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली आहे आणि हेच यश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही मिळवता येईल.
advertisement
पंतप्रधानांनी यावर भर दिला की, भारताकडे व्याप्ती, विविधता आणि लोकशाही यांचा एक अनोखा संगम आहे, ज्यामुळे जगाचा भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर विश्वास निर्माण झाला आहे. पंतप्रधान म्हणाले की ‘सर्वांसाठी एआय’ या आपल्या दृष्टिकोनाला अनुसरून आपण आपल्या तंत्रज्ञानाने प्रभाव निर्माण केला पाहिजे आणि जगाला प्रेरणा दिली पाहिजे. त्यांनी सीईओ आणि तज्ञांना भारताला जागतिक एआय प्रयत्नांसाठी एक पोषक ठिकाण बनवण्याचे आवाहनही केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/देश/
पंतप्रधानांनी एआय क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी साधला संवाद










