Thane News: ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी, नावावरून रंगली मोठी चर्चा; खासदारांची जोरदार मागणी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ठाणे- मुलुंड या स्थानकांमध्ये आणखी एक रेल्वे स्टेशन बांधले जाणार आहे. त्या स्थानकाबद्दलची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत दिली.
ठाणे: ठाणे आणि मुलुंडवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ठाणे आणि मुलुंड या दोन्हीही स्थानकांमध्ये आणखी एक रेल्वे स्टेशन बांधले जाणार आहे. त्या स्थानकाबद्दलची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत दिली. शिवाय त्यांनी त्या रेल्वे स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे' यांचं नाव दिले जावे, अशी मागणी सुद्धा संसदेमध्ये केली आहे. मुलुंड आणि ठाणे या दोन्हीही स्थानकांमध्ये उभारल्या जाणाऱ्या स्थानकासाठी रेल्वे मंत्र्यांनी 250 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असल्याची माहिती शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. ठाणे आणि मुलुंड या दोन्हीही स्थानकांमध्ये स्थानक उभारल्यानंतर या स्थानकांवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर विभाजीत होणार आहे.
नव्या रेल्वे स्टेशनसाठी रेल्वे मंत्र्यांकडे निधीची मागणी खासदार नरेश म्हस्के आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली होती. रेल्वे मंत्र्यांनी नव्या रेल्वे स्टेशनसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. दरम्यान, रेल्वे मंत्र्यांनी निधी मंजूर केल्यानंतर नव्या रेल्वे स्थानकाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्यानंतर लवकरच नव्या रेल्वे स्टेशनचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. त्यापाठोपाठ आता या नव्या रेल्वे स्थानकाला 'धर्मवीर आनंद दिघे स्थानक' असे नाव देण्याची मागणी काल (16 मार्च- सोमवार) संसदेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनेही त्यांनी मागणी केली.
advertisement
खरंतर, मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळ असणार्या रेल्वे स्थानकांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचाही समावेश होतो. या रेल्वे स्थानकात फक्त मध्य रेल्वेच नाही तर, ट्रान्स हार्बर रेल्वे सुद्धा सुटते. लोकलशिवाय अनेक लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस सुद्धा ठाणे रेल्वे स्थानकावर थांबतात. ठाणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. गर्दीच्या वेळी नेहमीच ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. ठाणे शहरातून नवी मुंबई आणि भिवंडी सारख्या शहरामध्ये अनेकजणं बसने प्रवास करत असतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर फार ताण येतो. ठाण्यामध्ये अनेक ऑफिसेस सुद्धा आहेत. पिक अवरच्या काळामध्ये अनेक प्रवाशांना लोकलमध्ये चढणं मुश्किल झालं आहे.
advertisement
फक्त ठाणे शहरातील लोकसंख्या सुद्धा 25 लाखांहून अधिक आहे. यामध्ये ठाणे ग्रामीणचा समावेश नाही. ठाणे आणि मुलुंड स्थानकामध्ये नवीन स्थानक उभारल्यानंतर ठाणे आणि मुलुंड या दोन्हीही रेल्वे स्थानकावरील गर्दीचा ताण निश्चित कमी होईल. शिवाय, ठाणेकरांचा रोजचा प्रवासही सुरक्षित होईल. नव्या रेल्वे स्थानकाचा निर्णय एक अर्थी ठाणेकरांसाठी सोयीस्कर ठरेल, हे नक्की.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 9:24 PM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Thane News: ठाणे-मुलुंडदरम्यान नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी, नावावरून रंगली मोठी चर्चा; खासदारांची जोरदार मागणी






