Tourist Places in Pune : नवीन वर्षाचे स्वागत करा निसर्गासोबत, पुण्यातील 5 स्पेशल ठिकाणं, PHOTOS
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांनी जोरदार तयारी केली आहे. अनेकजण निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी उत्सुक असतात.
नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात करण्याची तयारी पुणेकरांनी सुरू केली आहे. काही जण शहरातील हॉटेल्स, पार्ट्या आणि कार्यक्रमांना पसंती देतात, तर अनेकजण निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि आनंदी वातावरणात नववर्ष साजरे करण्याचा पर्याय निवडतात. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे नववर्षाची सुरुवात अविस्मरणीय करता येते. आज आपण जाणून घेऊया पुण्याजवळील पाच खास ठिकाणांबद्दल, जे नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहेत.
advertisement
1) लोणावळा – खंडाळा : पुण्यापासून अवघ्या 65 किलोमीटर अंतरावर असलेले लोणावळा-खंडाळा हे नववर्ष साजरे करण्यासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. थंड हवा, धुक्याची चादर, धबधब्यांचे सौंदर्य आणि आलिशान रिसॉर्ट्समुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते. अनेक हॉटेल्समध्ये नववर्षासाठी विशेष कार्यक्रम, म्युझिक नाइट्स आणि फायरवर्क्सचे आयोजन केले जाते. मित्रपरिवार आणि कपल्ससाठी हे ठिकाण खास आकर्षण ठरते.
advertisement
2) मुळशी धरण परिसर : शहरी गोंगाटापासून दूर, शांततेत नववर्ष साजरे करायचे असेल तर मुळशी धरण परिसर हा उत्तम पर्याय आहे. पुण्यापासून सुमारे 45 किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागात हिरवीगार डोंगररांग, पाण्याचा नितळ साठा आणि शांत वातावरण अनुभवता येते. येथे अनेक फार्महाऊस, होमस्टे आणि रिसॉर्ट्स उपलब्ध असून कुटुंबासोबत नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हा भाग अत्यंत योग्य मानला जातो.
advertisement
3) पवना लेक : अ‍ॅडव्हेंचर आणि निसर्ग यांचा संगम अनुभवायचा असेल, तर पवना लेक हा सर्वोत्तम पर्याय आहे. पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठिकाणी नववर्षाच्या रात्री कॅम्पिंग, बोनफायर, लाईव्ह म्युझिक आणि बार्बेक्यूचा अनुभव पर्यटक घेत आहेत. मित्रमंडळींसोबत आकाशाखाली नववर्षाचे स्वागत करण्याचा वेगळाच आनंद येथे मिळतो.
advertisement
4) भोर – भाटघर धरण : गर्दीपासून दूर आणि निसर्गाच्या कुशीत नववर्ष साजरे करण्यासाठी भोर तालुका आणि भाटघर धरण परिसर हे उत्तम ठिकाण ठरत आहे. पुण्यापासून अंदाजे 50 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण शांत वातावरण, धरणाचे सौंदर्य आणि थंड हवामानासाठी ओळखले जाते. फोटोग्राफी, निसर्गभ्रमंती आणि रिलॅक्सेशनसाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत आहेत.
advertisement
5) राजगड – तोरणा परिसर : नववर्षाची सुरुवात ट्रेकिंग आणि ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने करायची असेल, तर राजगड आणि तोरणा किल्ला परिसर हा सर्वोत्तम पर्याय आहे. पुण्यापासून जवळ असलेल्या या भागात ट्रेकर्स आणि तरुणांचा मोठा ओघ पाहायला मिळतो. पहाटेचा सूर्योदय, थंड हवा आणि शिवकालीन इतिहास नववर्षाच्या पहिल्या दिवसाला वेगळेच महत्त्व देतो.










