Weather Alert : महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल, आता दुहेरी संकट, हवामान खात्यानं दिला अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सकाळ आणि रात्री हलकी थंडी जाणवत असली, तरी दुपारच्या वेळेत उकाडा वाढताना दिसत आहे.
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हवामानात बदल जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून उत्तर दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी होत असून, किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ नोंदवली जात आहे. त्याच वेळी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे सकाळ आणि रात्री हलकी थंडी जाणवत असली, तरी दुपारच्या वेळेत उकाडा वाढताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 जानेवारी रोजी राज्यात दमट आणि आंशिक ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.
advertisement
कोकण किनारपट्टीवर सध्या हवामानात स्पष्टपणे बदल जाणवत आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उष्णता वाढलेली दिसेल. मुंबईत कमाल तापमान 30 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आर्द्रतेमुळे दमट वातावरण जाणवेल. काही भागांत अंशतः ढगाळ आकाश राहील, तर सकाळच्या वेळेत हलके धुके दिसू शकते. हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही, मात्र जोरदार पावसाचा अंदाज नाही.
advertisement
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहण्याची शक्यता आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात सकाळी थंडावा जाणवेल, मात्र सूर्य वर येताच तापमानात झपाट्याने वाढ होईल. पुण्यात कमाल तापमान 29 ते 31 अंश, तर किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. घाट भागात हलक्या सरींची शक्यता अधूनमधून असली, तरी बहुतांश भागात हवामान कोरडंच राहणार आहे. पुढील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता असून, दिवस उबदार आणि रात्री तुलनेने थंड अशी स्थिती राहील.
advertisement
मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा प्रभाव अजूनही जाणवत असला, तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ परिसरात सकाळी थंड वातावरण राहील, तर दिवसा तापमान वाढेल. या भागांत कमाल तापमान 29 ते 33 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः स्वच्छ ते आंशिक ढगाळ राहील आणि पावसाची शक्यता फारशी नाही. सकाळच्या वेळेत काही भागांत हलके धुके पडू शकते.
advertisement
एकूणच पाहता, 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झालेला असून उष्णता आणि दमटपणा वाढताना दिसेल. संक्रांतीच्या काळात हवामान बहुतांश भागांत सणासुदीसाठी अनुकूल राहणार आहे. पुढील काही दिवसांत तापमानात मोठा बदल होण्याची शक्यता नाही, मात्र सकाळ-रात्री थोडी थंडी आणि दुपारी उकाडा अशी संमिश्र स्थिती कायम राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.








