20 नोव्हेंबरला निवडणूक, 23 तारखेला निकाल, पण महायुती-महाविकास आघाडीसाठी 4 नोव्हेंबर का महत्त्वाची?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात यंदा फक्त एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होईल तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागतील.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या तारखांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात यंदा फक्त एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणूक होईल तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागतील. 29 ऑक्टोबर ही निवडणूक अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, तर 30 ऑक्टोबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही निवडणूक अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये 4 नोव्हेंबर ही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी महत्त्वाची तारीख ठरणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीन-तीन मोठे पक्ष असल्यामुळे जागा वाटपामध्ये अजूनही वादावादी सुरू आहे. तसंच तीन पक्ष असल्यामुळे प्रत्येक पक्षाला जागाही कमी येणार आहेत, त्यामुळे बंडखोरीही वाढणार आहे. अशात बंडखोरांना रोखण्यात कोण यशस्वी ठरतो, यावरही महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? याचा फैसला ठरू शकतो, या कारणामुळेच 4 नोव्हेंबर ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाची ठरू शकते.
advertisement
कमी मार्जिननी लागणार निकाल?
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे पक्ष आहेत. या मोठ्या पक्षांसह महाराष्ट्रात तिसरी आघाडीही तयार झाली आहे. तसंच वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि मनसेचंही आव्हान आहे. इतक्या छोट्या-मोठ्या पक्षांसह बंडखोरही निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर विजयी उमेदवार अत्यंत कमी मार्जिननी निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे, त्यामुळे बंडखोरांना रोखण्याचं आव्हान सगळ्याच राजकीय पक्षांसमोर असणार आहे.
advertisement
जागा वाटपावरून वादावादी
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाने जागावाटपात 107 जागा मागितल्या आहेत. मात्र, त्यांना 80 ते 85 जागा देण्याबाबत भाजप तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, शिवसेना शिंदे गटाला किमान 90 ते 95 जागा भाजपकडून सोडण्यात येतील असा विश्वास त्यांच्या नेत्यांना असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
advertisement
तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्येही उद्धव ठाकरेंच्या शिवेसनेने 140 जागांची मागणी केल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या या मागणीनंतर काँग्रेसचे नेते सोमवारी दिल्लीत हायकमांडला भेटायला गेले होते. या बैठकीत जागा वाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर होईल, असं राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2024 4:23 PM IST
मराठी बातम्या/Politics/
20 नोव्हेंबरला निवडणूक, 23 तारखेला निकाल, पण महायुती-महाविकास आघाडीसाठी 4 नोव्हेंबर का महत्त्वाची?