पुण्यात घायवळ गँगच्या मुसक्या आवळल्या, गोळीबार करून फरार झालेल्या पाच जणांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
काल रात्री पुण्यात कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या टोळीकडून एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: काल मध्यरात्री पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार घडला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या टोळीकडून एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. कोथरुड परिसरात गाडीला साईड न दिल्याच्या कारणातून हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड आणि गणेश राऊत असं अटक केलेल्या चार आरोपींची नावं आहेत. या चारजणांसोबत आणखी एका अज्ञात व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हे पाचही आरोपी घायवळ टोळीचे सदस्य आहेत. त्यांची पुण्यात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. हे पाचही आरोपी बुधवारी रात्री उशिरा कोथरुड भागात आले होते. यावेळी त्यांच्या गाडीला साईड न दिल्याच्या कारणातून पाच जणांनी एका व्यक्तीशी वाद घातला.
advertisement
हा वाद विकोपाला जाताच घायवळ टोळीतील पाचपैकी एकाने संबंधित कार चालकावर गोळीबार केला. यातील एक गोळी चालकाला लागली आहे. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या मांडीत गोळी लागली आहे. गोळीबार झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धुमाळ यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं.
advertisement
या हल्ल्यानंतर पाचही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. पण गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी मोठी कारवाई केली. गोळीबाराच्या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या घायवळ टोळीच्या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कोथरुड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 18, 2025 11:06 AM IST