Pune News: नवले पुलानंतर आता हिंजवडीतही वाहतुकीचे नवे नियम; मोडल्यास कडक कारवाई
- Published by:Kiran Pharate
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
आयटी पार्कसह मोठ्या प्रमाणात उभे राहत असलेल्या गृहप्रकल्पांमुळे या भागातील अवजड वाहतूक प्रचंड वाढली आहे. इथे गेल्या 11 महिन्यांतच 37 नागरिकांचा अपघातांमध्ये बळी गेला आहे
पिंपरी : कात्रज-नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबवत त्या मार्गावर अवजड वाहनांसाठी वेगमर्यादा 30 किमी प्रतितास निश्चित केली. त्याच धर्तीवर आता हिंजवडी, वाकड, ताथवडे, रावेत, पुनावळे परिसरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आणखी कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी पार्कसह मोठ्या प्रमाणात उभे राहत असलेल्या गृहप्रकल्पांमुळे या भागातील अवजड वाहतूक प्रचंड वाढली आहे. इथे गेल्या 11 महिन्यांतच 37 नागरिकांचा अपघातांमध्ये बळी गेला आहे.
सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात घेण्यात आलेल्या बैठकीत या गंभीर स्थितीवर उपाययोजना निश्चित करण्यात आली. हिंजवडी परिसरातील जड, अवजड वाहनांसाठी आता वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रतितास बंधनकारक करण्यात आली आहे. या मर्यादेचे पालन होते की नाही, यासाठी स्पीड गनच्या मदतीने सतत तपासणी होणार आहे. तसेच या परिसरातील सर्व जड वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या जीपीएस प्रणालीद्वारे अवजड वाहनांचा वेग, ब्रेकिंग पॅटर्न, ड्रायव्हिंग पद्धत आणि वाहनांची नेमकी लोकेशन याची माहिती पोलिसांना प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध होणार आहे.
advertisement
याशिवाय, सकाळी 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 या वेळेत अवजड वाहनांच्या प्रवेशावर असलेली बंदी अनेकदा पाळली जात नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे याविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. बांधकामासाठी लागणारा भारवाहू ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर वाढवणाऱ्या आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनधिकृत किंवा नियमबाह्य आरएमसी प्रकल्पांना पीएमआरडीएमार्फत नोटीस देऊन त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई केली जाणार आहे.
advertisement
अवजड वाहनांची सुरक्षा तपासणी, चालकांच्या परवान्यांची काटेकोर पडताळणी याशिवाय वाहतूक नियमांविषयी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी पोलिस, आरटीओ आणि वाहतूक विभागाचे संयुक्त पथक आरएमसी प्रकल्पांवरच प्रशिक्षण सत्र आयोजित करणार आहे. डंपर, हायवा आणि मिक्सर ट्रकच्या मागील चाकाखाली येऊन होणारे अपघात मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने प्रत्येक वाहनासोबत सहचालक ठेवणे, चाकांवर साईड बंपर बसवणे आणि अतिरिक्त सेफ्टी गॅझेट्स बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
advertisement
हिंजवडी परिसरातील वाहतूक सुरक्षिततेसाठी ही पावलं महत्त्वाची असून आगामी काळात अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यक्त केला. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक शिस्तबद्ध होण्यास मदत होणार आहे.
या बैठकीत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील, परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड तसेच आरटीओ अधिकारी संदेश चव्हाण आणि राहुल जाधव उपस्थित होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 25, 2025 9:33 AM IST


