पुणेकरांची चांदी! 1 एप्रिलपासून वीज बिल येणार कमी; महावितरणचा मोठा निर्णय, तुमच्या बिलात किती होईल बचत?
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा, इंधन आणि इतर उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे महावितरण, टाटा पॉवर आणि अदानी यांसारख्या कंपन्यांनी दर कपातीचा प्रस्ताव दिला होता.
पुणे: कडाक्याच्या उन्हात एसी आणि कुलरच्या वापरामुळे वाढणाऱ्या वीज बिलाची चिंता आता काहीशी मिटणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (MERC) महावितरणच्या वीजदर कपातीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आता १ एप्रिलपासून घरगुती वीज दरांमध्ये सरासरी ३० पैसे प्रतियुनिट कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुणे परिमंडळातील सुमारे ३८ लाख ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, महिन्याकाठी तब्बल १० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
वीज बिल स्वस्त होण्याची मुख्य कारणे
राज्य सरकारने गुरुवारी या निर्णयाची घोषणा केली. वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा, इंधन आणि इतर उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे महावितरण, टाटा पॉवर आणि अदानी यांसारख्या कंपन्यांनी दर कपातीचा प्रस्ताव दिला होता. विशेष म्हणजे, हा दिलासा केवळ एका वर्षासाठी नसून, २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने वीजदर कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
advertisement
एकीकडे वीजदर कमी झाले असले तरी, 'वहन आकारात' (Wheeling Charges) मात्र १३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. सध्याचा वहन आकार १ रुपया ४७ पैसे असून, १ एप्रिलपासून तो १ रुपया ६० पैसे इतका होईल. मात्र, मूळ वीजदरात झालेली कपात मोठी असल्याने ग्राहकांच्या एकूण बिलात बचतच होणार आहे.
पुणे परिमंडळातील लाभार्थी
पुणे शहर, आंबेगाव, राजगुरुनगर आणि हवेली या भागांतील ३८ लाख ७१ हजार ग्राहकांना याचा थेट फायदा होईल. यामध्ये प्रामुख्याने:
advertisement
३३ लाख ८७ हजार घरगुती ग्राहक
५७ हजार ५६० औद्योगिक ग्राहक
३ लाख ९५ हजार वाणिज्यिक ग्राहक
१ लाख १ हजार कृषिपंप धारक
यामध्ये सर्वसामान्यांचा फायदा होणार असल्याने नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऐन उन्हाळ्यात वीज बिल कमी होणार असल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांची चांदी! 1 एप्रिलपासून वीज बिल येणार कमी; महावितरणचा मोठा निर्णय, तुमच्या बिलात किती होईल बचत?










