IT मध्ये प्रोग्राम मॅनेजर दीपालीनं करून दाखवलं, थायलंडमध्ये पटकावला 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स'चा किताब
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
थायलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल 2025 या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत त्यांनी 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' हा मानाचा किताब पटकावत भारताचा आणि विशेषतः पुण्याचा नावलौकिक वाढवला आहे.
पुणे: कोणतेही क्षेत्र असो, मेहनत, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्याच्या दीपाली अमृतकर-तांदळे. थायलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल 2025 या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत त्यांनी 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स' हा मानाचा किताब पटकावत भारताचा आणि विशेषतः पुण्याचा नावलौकिक वाढवला आहे.
दीपाली अमृतकर-तांदळे या मूळच्या पिंपळे गुरव येथील रहिवासी असून त्या आयटी क्षेत्रात प्रोग्राम मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. व्यावसायिक जबाबदाऱ्या, कुटुंब, आई आणि पत्नीची भूमिका सांभाळत त्यांनी जागतिक व्यासपीठावर पोहोचण्याचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला. हा प्रवास सहजसोपा नव्हता, मात्र जिद्द, सराव आणि आपल्या संस्कृतीवरील प्रेम यामुळे त्यांनी हे शिखर गाठले. या स्पर्धेपूर्वी नॅशनल लेव्हलवर त्यांची निवड झाली होती. त्यानंतर भारताचे प्रतिनिधित्व करत त्या इंटरनॅशनल लेव्हलवर पोहोचल्या. या स्पर्धेत तब्बल 25 देशांतील 40 स्पर्धक सहभागी झाले होते.
advertisement
प्रत्येक स्पर्धकाने आपल्या देशातील सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि कला यांचे सादरीकरण केले. दीपाली यांनीही भारतीय संस्कृतीचे बहुरंगी दर्शन घडवले. स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात सांस्कृतिक सादरीकरणासाठी व्हिडिओ सादर करावा लागला होता. पुढे थायलंडमध्ये प्रत्यक्ष टॅलेंट राउंडमध्ये त्यांनी भारतीय लोकनृत्य सादर केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध लोककला, नृत्यप्रकार, परंपरा यांचा अभ्यास करून त्यांनी हे सादरीकरण साकारले. बंगाली पेहराव, राजस्थानी संस्कृतीचे दर्शन आणि नववारी साडीत सादर केलेले मराठमोळे गणेशस्तवन यामुळे त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
advertisement
भारतीय संस्कृतीच्या या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांकडून आणि परीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. दीपाली म्हणाल्या, "जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. ही स्पर्धा माझ्या रोजच्या रुटीनमधील नव्हती, त्यामुळे हा प्रवास खडतर होता. मात्र आपल्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मी अधिक जोमाने तयारी केली. भारतीय संस्कृती पाहून उपस्थितांनी दिलेला प्रतिसाद पाहून माझा ऊर अभिमानाने भरून आला."
advertisement
सोसायटी स्तरावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, कला-जपणूक आणि परंपरांचे संवर्धन हे दीपाली यांच्या आयुष्याचा भाग राहिला आहे. त्याच अनुभवातून त्यांना जागतिक पातळीवर आपले कौशल्य सादर करण्याची प्रेरणा मिळाली. आयटी प्रोफेशनल ते जागतिक स्पर्धेची विजेती असा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 6:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
IT मध्ये प्रोग्राम मॅनेजर दीपालीनं करून दाखवलं, थायलंडमध्ये पटकावला 'मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स'चा किताब









