Pune Metro: पुण्यात नव्या मेट्रोचा मार्ग मोकळा, कुठून कुठं धावणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune Metro: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने पुण्यातील दोन नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे.
पुणे: पुणे शहरात अनेक ठिकाणी मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. प्रतीक्षेत असलेल्या पुणे महानगर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-2 मधील खडकवासला–स्वारगेट–हडपसर खराडी या दोन मार्गांच्या उपमार्गांना शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रोड या दरम्यान मेट्रो उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून या भागातील नागरिक मेट्रो कधी सुरू होणार याची वाट पाहत होते. आता या कामांना सरकारची मान्यता मिळाल्याने नागरिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेट्रो रेल प्रकल्पाचा टप्पा-2 पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाढती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. हडपसर, लोणी काळभोर, फुरसुंगी आणि सासवडसारख्या वेगाने विस्तारत असलेल्या भागांना या टप्प्याचा थेट लाभ मिळणार असून जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
advertisement
Pune-Mumbai Train : पुणे-मुंबई रेल्वेसेवा 3 दिवस 'ठप्प'; या 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना विलंब
या दोन्ही मेट्रो मार्गांवर तीन डब्यांची गाडी धावणार असून, प्रत्येक गाडीत सुमारे 975 प्रवाशांची क्षमता असेल. प्रकल्प सुरू झाल्यापासून सुमारे चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मेट्रोच्या हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण 16 किलोमीटर लांबीच्या असून, त्यात एकूण 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. या दोन्ही उपमार्गिकांसाठी पाच हजार 704 कोटी रुपये खर्च येणार आहे.
advertisement
हडपसर ते लोणी काळभोर हा मार्ग 11.102 किलोमीटर लांबीचा असेल. हडपसर बस डेपो ते सासवड रोड हा मार्ग 5.557 किलोमीटर लांबीचा असणार आहे. या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने जमीन, भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी 403.36 कोटी रुपये महामेट्रोला देण्याचे निर्देश दिले आहेत. हे मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता महामेट्रो व महापालिकेने घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
advertisement
नव्या मेट्रो मार्गाची वैशिष्ट्ये
हडपसर ते लोणी काळभोर मेट्रो
एकूण लांबी 11 कि.मी.
एकूण स्थानके 10
आवश्यक जमीन 16.31 हेक्टर
प्रकल्पाची एकूण किंमत: 4 हजार 152 कोटी
हडपसर ते सासवड रोड मेट्रो
एकूण लांबी 5.5 कि.मी.
एकूण स्थानके- 4
आवश्यक जमीन 0.8 हेक्टर
प्रकल्पाची एकूण किंमत: 1 हजार 552 कोटी
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 06, 2025 12:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro: पुण्यात नव्या मेट्रोचा मार्ग मोकळा, कुठून कुठं धावणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती


