Jejuri News: जरा थांबा! जेजुरी दर्शनावेळी तुम्हीही भंडारा उधळता? भडका प्रकरणानंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
बेळगाव येथून भेसळयुक्त भंडारा घेऊन आलेला एक टेम्पो जप्त करण्यात आला असून, संशयित भंडाऱ्याचे अनेक नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
जेजुरी: खंडोबा गडाच्या पायरीशी रविवारी घडलेल्या भंडाऱ्याच्या भीषण भडक्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या दुर्घटनेत दोन नगरसेविकांसह १६ जण भाजले गेल्याच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सोमवारी जेजुरीत धडक मोहीम राबवून भेसळयुक्त भंडाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईत बेळगाव येथून भेसळयुक्त भंडारा घेऊन आलेला एक टेम्पो जप्त करण्यात आला असून, संशयित भंडाऱ्याचे अनेक नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
नेमकी कारवाई काय?
अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी वर्षा बारवकर, रजिया शेख, लक्ष्मीकांत सावळे आणि डॉ. संदीप शिंदे यांच्या पथकाने जेजुरी गड आणि शहरातील मुख्य बाजारपेठेत ही मोहीम राबवली. खंडोबा गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि शहरात ठिकठिकाणी भंडारा विक्रेत्यांची झाडाझडती घेण्यात आली. या मोहिमेत जेजुरी पोलिसांनीही सक्रिय सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
advertisement
नगर परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रविवारी जल्लोष करताना कार्यकर्त्यांनी गडाच्या पायरीवर भंडाऱ्याची उधळण केली होती. यावेळी भंडाऱ्याचा अचानक भडका उडाल्याने १६ जण जखमी झाले. या घटनेमुळे भंडाऱ्यात मिसळल्या जाणाऱ्या ज्वलनशील केमिकल्सचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त करत कडक कारवाईची मागणी केली होती.
advertisement
वर्षानुवर्षांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष: जेजुरीतील खांदेकरी, मानकरी आणि ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून भेसळयुक्त भंडाऱ्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. २०२१-२२ मध्ये देवस्थान ट्रस्टने आणि काही महिन्यांपूर्वी माजी विश्वस्तांनी मंत्र्यांची भेट घेऊन उत्पादक कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता ही मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मांढरदेवीसारख्या दुर्घटनांचा धडा घेऊन जेजुरीत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना आणि केमिकलयुक्त भंडाऱ्यावर पूर्णतः बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
advertisement
नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी जखमींच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना सांगितले की, सर्व जखमी आता धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे काटेकोर पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 7:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Jejuri News: जरा थांबा! जेजुरी दर्शनावेळी तुम्हीही भंडारा उधळता? भडका प्रकरणानंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये









