खडकवासल्यात थरार; पार्टी अन् मस्करीनंतर मित्राच्या डोक्यात झाडली गोळी, सकाळी पुलाखालचं दृश्य पाहून सगळे हादरले
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
रात्री खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे विशाल आणि त्याचे ४ ते ५ मित्र पार्टीसाठी जमले होते. सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेत एकमेकांची चेष्टा-मस्करी सुरू असताना अचानक वादाला तोंड फुटले
पुणे : पुणे शहराजवळील खडकवासला परिसरात मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या एका २५ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशाल संजय चव्हाण (रा. कोल्हेवाडी, किरकटवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून, किरकोळ वादातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी रात्री खडकवासल्यातील कोल्हेवाडी येथे विशाल आणि त्याचे ४ ते ५ मित्र पार्टीसाठी जमले होते. सुरुवातीला मद्यधुंद अवस्थेत एकमेकांची चेष्टा-मस्करी सुरू असताना अचानक वादाला तोंड फुटले. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका मित्राने रागाच्या भरात पिस्तूल काढून विशालच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागताच विशालचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न: मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून घाबरलेल्या इतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विशालचा मृतदेह डोणजे (ता. हवेली) येथील पानशेत रस्त्यावरील एका पुलाखाली फेकून दिला आणि तिथून पळ काढला. बुधवारी सकाळी या मृतदेहाची माहिती मिळताच हवेली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा सखोल तपास सुरू आहे. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. खडकवासला सारख्या पर्यटन स्थळाजवळ घडलेल्या या थरारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 8:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
खडकवासल्यात थरार; पार्टी अन् मस्करीनंतर मित्राच्या डोक्यात झाडली गोळी, सकाळी पुलाखालचं दृश्य पाहून सगळे हादरले









