हाच निर्णय आंचल ऐवजी पुरुषाने घेतला असता तर? समाज असाच वागला असता का? डोळ्यात अंजन घालणारं उत्तरं
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
समाजाची मानसिकता नेमकी कुठे चालली आहे, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल मानसोपचार तज्ज्ञ गायत्री सहस्त्रबुद्धे यांनी संवाद साधला आहे.
पुणे: नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची निर्घृण हत्या झाल्यानंतर राज्यभरात संतापाचा उद्रेक झाला आहे. या प्रकरणात सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने त्याच्या पार्थिवाशी लग्न करून त्याच्यावरचं प्रेम निभावलं. या घटनेनंतर आरोप होत असताना आंचलने स्वतःच्या वडिलांना आणि भावाला शिक्षा म्हणून फाशीची मागणी केली. तिच्या या निर्णयानं सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
मात्र या संपूर्ण प्रकरणात दुर्दैवी गोष्ट म्हणजे, आंचलला मिळायला हवा तो आधार आणि सहानुभूती मिळण्याऐवजी सोशल मीडियावर तिच्यावर अतिशय अमानवी टीका होताना दिसत आहे. मुलीलाही मारलं असतं तर बरं झालं असतं, अशा टिप्पण्या पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाची मानसिकता नेमकी कुठे चालली आहे, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबद्दल 'लोकल 18'सोबत मानसोपचार तज्ज्ञ गायत्री सहस्त्रबुद्धे यांनी संवाद साधला आहे.
advertisement
मानसोपचार तज्ज्ञ गायत्री सहस्त्रबुद्धे या म्हणतात की, "आपल्या समाजात मुलींवर नियंत्रण ठेवणारी मानसिकता आजही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे. अनेक घरांमध्ये मुलीला शिक्षण, करिअर, विवाह याबाबत स्वातंत्र्य देण्याऐवजी वडील आणि मोठे भाऊ निर्णय घेण्याचा अधिकार घेतात. समाजाची किंवा कुटुंबाची प्रतिष्ठा ही चुकीची कल्पना मुलींच्या आयुष्याशी जोडून ठेवली गेली आहे. मुलगी घरच्या मनाविरुद्ध वागली, तर तिला शिक्षा करणे हा अधिकार आपल्याकडे काही जण सहज समजतात."
advertisement
"हेच मुलांच्या बाबतीत मात्र घडताना क्वचित दिसते. मुलाने परजातीतील मुलीशी नातं जोडलं तर त्यांच्यावर हिंसा किंवा हत्या घडण्याची शक्यता अत्यंत कमी असते. पण मुलगी हेच पाऊल उचलली तर समाज बिथरतो, राग उफाळून येतो आणि काहीजण गुन्ह्याला जायला मागेपुढे पाहत नाहीत. हीच दुहेरी मानसिकता समाजातील स्त्रीद्वेषाला खतपाणी घालते. आजच्या काळात वेब सिरीज, चित्रपट, सोशल मीडिया यामध्ये प्रतिष्ठा जपण्यासाठी हिंसा दाखवणारे प्रसंग वारंवार दाखवले जातात. हे चित्रण बघून अनेक तरुण यालाच योग्य मार्ग समजू लागतात."
advertisement
सहस्त्रबुद्धे सांगतात, "जेव्हा एखादा गुन्हा योग्य ठरवला जातो किंवा त्याला समाजात पाठिंबा मिळतो, तेव्हा ती विकृती झपाट्याने वाढते. या प्रकरणात ज्या प्रकारे समाजमाध्यमांवर जातीयतेचे विष पसरत आहे, तेही धोकादायक आहे. राजकीय हेतूने जातपात उकरून काढली जाते आणि लोकांच्या मनात भेदभाव वाढवला जातो. आंतरजातीय नात्यांविरोधातील हा आक्रमक दृष्टिकोन समाजाला मागास बनवतो. सहस्त्रबुद्धे सांगतात, आमच्या मनाविरुद्ध केलं म्हणजे मारून टाका ही मानसिकता रोगासारखी पसरत आहे. आणि तिच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होणं अत्यावश्यक आहे."
advertisement
"आंचलच्या परिस्थितीत तिला आधार देण्याऐवजी उलट तिला ट्रोल करणं, तिच्यावर आरोप करणं किंवा मृत्यूची इच्छा व्यक्त करणं ही अतिशय भयंकर प्रवृत्ती आहे. ज्यांना घटनेची गंभीरता कळत नाही, ते सोशल मीडियावर विषारी मतं पसरवून परिस्थिती अधिक भयानक करत आहेत. शिक्षणाचा अभाव, चुकीच्या रूढी-परंपरा आणि मुलींबद्दलच्या चुकीच्या सामाजिक संकल्पना या सगळ्यामुळे अशा घटनांना खतपाणी मिळत आहे. समाज बदलण्यासाठी शिक्षणाबरोबरच विचारसरणीत बदल आवश्यक आहे. सक्षम ताटेची हत्या ही फक्त आंतरजातीय प्रेमाशी संबंधित घटना नाही तर आपल्या समाजातील विकृत मानसिकतेचा अत्यंत वेदनादायी असं उदाहरणं आहे. या मानसिकतेचा नायनाट झाला नाही तर अशा घटनांची मालिका थांबणार नाही." असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 01, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
हाच निर्णय आंचल ऐवजी पुरुषाने घेतला असता तर? समाज असाच वागला असता का? डोळ्यात अंजन घालणारं उत्तरं

