Pune News: पुण्यात 500 रूपयांसाठी तडीपार गुंडाकडून भयंकर त्रास; महिलेनं उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
एका महिला टपरी चालकाला एका तडीपार गुंडाने मासिक हप्त्यासाठी इतका त्रास दिला की, अखेर या महिलेने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला
पिंपरी-चिंचवड: शहरात तडीपार गुंडांची दहशत किती वाढली आहे, याचा एक भयंकर नमुना चिंचवडमध्ये पाहायला मिळाला. लांडेवाडी येथील एका महिला टपरी चालकाला एका तडीपार गुंडाने मासिक हप्त्यासाठी इतका त्रास दिला की, अखेर या महिलेने पोलीस आयुक्त कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनिता सागर लांडगे (वय ५०) यांची लांडेवाडी येथे 'ममता' नावाची पानटपरी आहे. आरोपी सचिन डॅनियल खलसे (वय ४०) हा तडीपार गुंड असून तो अनिता यांच्या टपरीवर आला होता. त्याने घेतलेल्या सिगारेट आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे अनिता यांनी मागितले, ज्याचा त्याला राग आला. "तुला जर टपरी चालवायची असेल, तर दर महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझी टपरी जाळून तुला मारून टाकीन," अशी धमकी त्याने दिली.
advertisement
पोलिसांच्या कारवाईनंतरही छळ सुरूच
याप्रकरणी अनिता यांनी भोसरी एमआयडीसी पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी आधी कारवाई केली, मात्र जामिनावर सुटल्यानंतर खलसेने पुन्हा अनिता यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही तो दाद देत नसल्याने व्यथित झालेल्या अनिता यांनी गुरुवारी सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला.
advertisement
दोघांवरही गुन्हे दाखल
याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी सचिन खलसेला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. दुसरीकडे, सार्वजनिक ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनिता लांडगे यांच्यावरही चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीनं पुन्हा त्रास दिल्याबाबत महिलेनं कोणतीही तक्रार दिली नाही. त्यांनी थेट आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजले. मात्र, त्यांनी नव्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, खलसेवर खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 7:29 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात 500 रूपयांसाठी तडीपार गुंडाकडून भयंकर त्रास; महिलेनं उचललं टोकाचं पाऊल









